प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत बुडणाऱ्या तरुणाचा वाचवला जीव; पाताळगंगा नदीत थरारक वॉटर रेस्क्यू  

चौक | अर्जुन कदम 
हेल्प फाऊंडेशन खोपोलीचा खंदा कार्यकर्ता आणि अपघातग्रस्तांचा देवदूत अमोल कदम याने वॉटर रेस्क्यूमधील आपला अनुभव पुन्हा एकदा पणाला लावला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन एकाचा अनमोल प्राण अमोलने वाचविला.
हेल्प फाऊंडेशन ची भक्ती साठेलकर हिचा निरोप मिळताच अमोल याने महेश भोसले याच्या सोबत आय.ओ.सी. ब्रिजवरून पाताळगंगा नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. ज्या महिलेने त्या व्यक्तीला पाण्यात बुडताना पाहिले होते, तिचा मुलगा इम्रान शेख हादेखील मदतीसाठी त्यांच्यासोबत होता.शोध सुरू असतानाच अमोलने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. इतरांकडून शोध घेत असताना तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पाण्यात उतरला. त्याचा हाच निर्णय निर्णायक ठरला आणि एकाचा जीव वाचला.
नदीच्या पात्रात काही अंतरावर अमोल याला बुडणार युवक पाण्यात गटांगळ्या खाताना दिसला. तीथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन क्षणाचाही विलंब न करता अमोलने उलट दिशेने पोहून त्याच्यापर्यंत पोहचला, आणि बुडणाऱ्या तरुणाला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. या संपूर्ण मोहिमेत महेश भोसले आणि इम्रान शेख यांचीही मोलाची साथ मिळाली.अखेर त्या युवकाला आय.ओ.सी. ब्रिज जवळ सुरक्षितपणे आणण्यात आले.
हेल्प फाऊंडेशन चे गुरू गुरुनाथ साठेलकर यांच्या तालमीत तयार झालेल्या अमोलने पूर्वानुभव आणि प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता या मुळे एखाद्याचा जीव वाचवता येतो.हाच फॉर्म्युला आज अमोल कदमने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला . बुडणाऱ्या  व्यक्तीचे नाव सचिन असे असून त्याला खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे दाखल केले असून. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.