कर्जत तालुक्यात शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या पोशीर धरण, शिलार धरण तसेच ३००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शविला असून, “हे प्रकल्प कर्जतमध्ये नकोत, दुसरीकडे उभारावेत” या मागणीसाठी आज कर्जत येथील टिळक चौकात कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना लेखी निवेदनही देण्यात आले.
कर्जत तालुक्यात यापूर्वीही विविध धरण प्रकल्प उभारण्यात आले असून, त्याचा स्थानिकांना अपेक्षित लाभ झाला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. १९१२ साली ब्रिटिश काळात पळसदरी परिसरात रेल्वेच्या वाफेच्या इंजिनांसाठी बांधण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा आजही स्थानिक गावांना फारसा फायदा होत नसल्याचे सांगण्यात आले. तसेच ३१ वर्षांपूर्वी सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या पाली-भुतिवली धरणाचे कालवे अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. सदर धरणाचे पाणी आता तळोजा एमआयडीसीसाठी वळविण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.
कोंढाणा धरण प्रकल्पाचाही उल्लेख करत आंदोलकांनी सांगितले की, उल्हास नदीवरील हा प्रकल्प मूळतः सिंचनासाठी होता; मात्र आता तो नवी मुंबई, पनवेल आणि नैना परिसराच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ११४४ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनजमिनींचा समावेश आहे.
दरम्यान, प्रस्तावित पोशीर धरण प्रकल्पामुळे ओलमन, नांदगाव, चई, बोरगाव, चेवणे, बॉशेत, भोपळेवाडी, पेंढरी, चाफेवाडी, झगरेवाडी, ऐनाची वाडी, कोतवालवाडी, बळीवरे, खांडस आदी गावांतील सुमारे १० हजार कुटुंबांवर विस्थापनाचे संकट ओढवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ५४१६ एकर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आणि वनजमिनींचा समावेश आहे. या धरणातील पाणी नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर परिसरासाठी वापरण्याचा प्रस्ताव असल्याने स्थानिकांना त्याचा फायदा होणार नसल्याचा आरोप करण्यात आला.
शिलार धरण प्रकल्पाबाबतही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पामुळे सुमारे १५०० हेक्टर जमीन बाधित होणार असून त्यातील बहुतांश जमीन खाजगी व शेती क्षेत्रातील आहे. या धरणातील पाणीही नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी वापरले जाणार असल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.
याशिवाय पश्चिम घाटातील संवेदनशील परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या ३००० मेगावॅट क्षमतेच्या टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पालाही मोठा विरोध करण्यात आला. पाली-साई डोंगर आणि ढाक परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे ९३२ एकर जमीन लागणार असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनजमिनींचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे भीमाशंकर परिसरातील जंगल, वनस्पती आणि वन्यजीव धोक्यात येतील तसेच पर्यावरणीय समतोल बिघडेल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. तसेच या प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या हायटेन्शन लाईन्समुळे सुमारे १०० गावे प्रभावित होणार असून, स्थानिकांच्या जमिनी व घरांचे मूल्य कमी होईल तसेच विकासकामांवर परिणाम होईल, असेही आंदोलकांनी सांगितले.
या सर्व प्रकल्पांविरोधात पुढील काळात कर्जत ते मंत्रालय असा भव्य पायी मोर्चा काढण्यात येणार असून, न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे प्रमुख अॅड. कैलास मोरे यांनी दिली.