तालुक्यातील मोरगिरी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा ‘पोक्सो’ गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी सात आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले असून आरोपी क्रमांक ६ चा अल्पवयीन असलेल्या आरोपीबद्दल उद्या कर्जत ज्युवेनाईल कोर्टात निकाल दिला जाणार आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित ‘सेक्स स्कँडल’ला अखेर पुर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
पोलादपूर येथील जत्रोत्सवातून मोरगिरीतील भोसले फार्महाऊस येथे नेऊन अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवत बलात्कार करून पुन्हा पोलादपूर एस टी बसस्थानकाजवळ सोडून दिल्याची फिर्याद पोलादपूर पोलीस ठाण्यात मोरगिरी दळवीवाडीतील आरोपी निलेश प्रकाश दळवी दि.९ ऑगस्ट २०१८ रोजी दाखल करण्यात आली. यानंतर महाड शिंदेकोंड येथील संकेश उर्फ संकेत दत्ताराम घाणेकर, पोलादपूर शहरातील सैनिकनगर येथील माणिक उर्फ तुषार शांताराम जाधव, शिवाजीनगर येथील सुज्योत सुभाष गांधी, भैरवनाथनगर येथील मोहित सुभाष बुटाला उर्फ गुजर , पोलादपूर तालुक्यातील ओंबळीतील सध्या दिवा ठाणे येथील रहिवासी अजय रमेश सकपाळ तसेच अल्पवयीन आरोपी शुभम दीपक शिंदे यांची पोलादपूर पोलिसांनी तपासाअंती धरपकड सुरू केली. २०१८ च्या अनंत चतुर्दशीच्या संध्याकाळी यापैकी ४ आरोपी पोलादपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
माणगाव सत्र न्यायालयात पिडित मुलीचा फौजदारी प्रक्रिया संहिता १६१ व १६४ अन्वये जबाब घेण्यात आला. याचदरम्यान पिडित अल्पवयीन मुलगी प्रसुत होऊन तिला मुलगी झाली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत झाल्यानंतर डिएनए टेस्ट केवळ अजय सकपाळ याच्यासोबत जुळली होती. कॉल रेकॉर्ड, अल्पवयीन मातृत्व लाभलेल्या पिडितेच्या जन्म प्रमाणपत्रावर तिच्या आईचे नाव वेगळे आणि पालकांचा पत्ता नसल्याने अल्पवयीन असल्याचा पुरावा अग्राह्य आहे तसेच तिचे विविध आरोपींबाबतचे कथन विश्वासार्हतेचे नसल्याचे आणि मोरगिरी गावातील राजकीय व्यक्तींचे हेतू साध्य करण्यासाठी फिर्याद अशा अनेक कारणांमुळे आठ पैकी सात आरोपींचे एडव्होकेट एस.आर.कांबळे, एडव्होकेट श्रीराम वाडकर, एडव्होकेट सतीश म्हात्रे व एडव्होकेट पांढरे, एडव्होकेट घायाळ, एडव्होकेट अभिजित कदम तसेच एडव्होकेट मंगेश एकनाथ मोहिरे या वकीलांनी बचाव पक्षातर्फे यशस्वीपणे बाजू मांडली.
या प्रकरणात न्यायाधीश मुकेश कमलाकर पाटील आरोपी क्र. १) निलेश प्रकाश दळवी, २) संकेश ऊर्फ संकेत दत्ताराम घाणेकर, ३) माणिक ऊर्फ तुषार शांताराम जाधव, ४) सुज्योत सुभाष गांधी, ५) मोहित सुभाष बुटाला ऊर्फ गुजर, ७) सागर शिवराम नगरकर, ८) अजय रमेश सकपाळ या आठ पैकी सात आरोपींना याप्रकरणी पोक्सो गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी बाजू मांडली.
————————————————-
पिडित मुलीपेक्षा दीड वर्षांनी लहान; आरोपीबाबत होणार उद्या निकाल
पिडीत मुलीपेक्षा दीड वर्षांनी लहान असलेला अल्पवयीन आरोपी शुभम दीपक शिंदे याची कर्जत येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. केवळ दहावी इयत्तेत शिकत असताना शुभम दीपक शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पिडितेपेक्षा लहान मुलाच्या पोक्सो गुन्ह्यातील समावेशामुळे त्यावेळी चर्चा झाली. उद्या शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी त्याच्या संदर्भात कर्जत ज्युवेनाईल कोर्टात निकाल दिला जाणार आहे.
————————————————-
एक आरोपी कायम तुरुंगाबाहेर; वकील मंगेश मोहिरे यांचे प्रयत्न
या प्रकरणात सहा पैकी तीन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तीन पैकी आनंदनगर येथील सागर शिवराम नगरकर याला एडव्होकेट मंगेश एकनाथ मोहिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतल्याने अन्य आरोपींप्रमाणे तळोजा कारागृहात किंवा अन्य तुरुंगात जावे लागले नाही.