पोलादपूर ( शैलेश पालकर ) : नगरपंचायत पोलादपूरच्या विषय समिती सभापतींच्या निवडीमध्ये भाजपच्या एकमेव नगरसेविकेला विषयसमितीच्या सभापतीपदाची संधी मिळाल्याने शिवसेना भाजप युती झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करूनही त्यांना वर्षभरात सत्तास्थापनेबाबत कोणतीही हालचाल करता आली नसल्याने काँग्रेसप्रमाणे ठाकरेगटात जाऊनही या सर्व सहा नगरसेवकांना विरोधी गटातच बसावे लागल्याचे दिसून येत आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सोनाली गायकवाड यांची निवड झाली असून उपनगराध्यक्षपदी नागेश पवार यांची निवड झाल्यानंतर काही महिन्यांतच विरोधी गटाच्या काँग्रेस नगरसेवकांनी ठाकरे गटामध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेमधून निवडून आलेले काही नगरसेवक आणि नगरसेविकांच्या पतींच्या मदतीने ठाकरे गटाचे नगरसेवक नगरपंचायतीवर सत्तास्थापनेचे प्रयत्न करीत असल्याने एका नगरसेविकेच्या पतीला गुन्हा दाखल होण्याच्या कारवाईला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर ‘नको ते सत्तांतर’ अशा भुमिकेतून सर्व हालचाली ठप्प झाल्या आहेत. परिणामी, पोलादपूर नगरपंचायतीमध्ये सत्तांतराची प्रक्रिया ठप्प झाली असताना राज्यातील शिवसेना भाजप युतीच्या समीकरणानुसार नगरपंचायतीमध्येदेखील शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षांच्या पत्नी विरोधात निवडून आलेल्या भाजप नगरसेविका अंकिता जांभळेकर निकम यांना नियोजन, अर्थ, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य सभापतीपदाची संधी प्राप्त होऊन सत्ताधारी गट अधिकच मजबूत झाला आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या आज बुधवारी झालेल्या विविध विषय समिती सभापती पदाच्या निवडीमध्ये सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सुनीता ज्ञानदेव पार्टे तर सदस्यपदी विनायक दिक्षित, सुरेश पवार, दिलीप भागवत, निखिल कापडेकर, पाणीपुरवठा व दिवाबत्ती समिती सभापतीपदी प्रसाद इंगवले, सदस्य पदी सिध्देश शेठ, मनोज प्रजापती, स्वप्नील भुवड, आशा गायकवाड, नियोजन, अर्थ, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य सभापतीपदी अंकिता जांभळेकर निकम, सदस्यपदी विनायक दिक्षित, सुरेश पवार, आशा गायकवाड, संतोष चव्हाण, सार्वजनिक आरोग्य व मालमत्ताकर समिती सभापतीपदी नागेश पवार, सदस्यपदी मनोज प्रजापती, स्वप्नील भुवड, श्रावणी शहा, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी अस्मिता पवार, शिल्पा दरेकर, तेजश्री गरूड तर स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिध्द नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पार्टे, प्रसाद इंगावले, अंकिता जांभळेकर निकम, अस्मिता पवार या विषय समिती सभापतींची वर्णी लागली आहे.
या निवडीचे पिठासन अधिकारी म्हणून महाडचे प्रांताधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे यांनी कामकाज पाहिले.