
पोलादपूर ( शैलेश पालकर ) :
पोलादपूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर समावेशनाविना आतापर्यंत तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत जगताप यांना नगरपंचायतीच्या कर्मचारीवृंदाकडून नियत कालावधी संपुष्टात आल्याने सेवानिवृत्तीबद्दल बुधवारी भावपूर्ण निरोप दिला. ग्रामपंचायतीपासून सेवेत असलेले जुने अनुभवी कर्मचारी लिपिक गणपत मोरे, सफाई कर्मचारी जयश्री मोरे हे यापूर्वी सेवानिवृत्त झाले असून चंद्रकांत जगताप हे तिसरे कर्मचारी समावेशनाविनाच सेवानिवृत्त झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार रिक्त मंजूर पदांची भरती अद्याप झाली नसताना दुसरीकडे ग्रामपंचायतीचा जुना कर्मचारीवर्ग समावेशनाअभावी केवळ पुर्वीच्याच पगारावर काम करीत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, अनुभवी कर्मचाऱ्यांना अर्धबेकारी पत्करावी लागली आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीचे 1 मार्च 2014 रोजी नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. यानंतर राज्यसरकार संवर्ग सेवानिहाय पदसंख्या मंजूर करण्यात आली आहे. ब श्रेणीचे स्थापत्य व अभियांत्रिकी सेवा 1 पद मंजूर असूनही रिक्त आहे. क श्रेणीची लेखापाल व लेखापरिक्षक मंजूर पदे दोन असून 1 रिक्त आहे. करनिर्धारण व प्रशासकीय सेवा ब श्रेणीचे 1 पद आणि क श्रेणीचे 1 पद रिक्त आहे. विकास सेवा क श्रेणीचे 1 पद मंजूर असूनही ते रिक्त आहे. त्यामुळे या सर्व संदर्भ क्रमांक 1 पैकी 6 मंजूर पदांपैकी 3 पदे रिक्त असून 3 पदे भरलेली आहेत. याखेरिज, संदर्भ क्रमांक 3 राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त लिपिक टंकलेखक 5 मंजूर पदांपैकी केवळ 1 पद भरले आहे तर उर्वरित स्वच्छता निरिक्षक 1 मंजूर पद, तारतंत्री वायरमन 1 मंजूर पद, गाळणीचालक व प्रयोगशाळा सहायक 2 मंजूर पदे, पंप ऑपरेटर विजतंत्री जोडारी 1 मंजूर पद अशा एकूण 10 मंजूर पदांपैकी 9 पदे रिक्त आहेत. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची शिपाई, मुकादम आणि व्हाल्वमन ही तीन मंजूर पदे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनामुळे भरली गेली आहेत.
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये राज्यस्तरिय संवर्गातील 19 मंजूर पदांपैकी केवळ 7 पदे भरली गेली असून 50 टक्केपेक्षा कमी कर्मचारीवर्ग असताना नगरपंचायतीच्या विकासाचं गाडं चालविण्याची जबाबदारी पोलादपूरचे मुख्याधिकारी विराज लबडे यांनी गेल्या वर्षभरात हजर होत समर्थपणे पेलली आहे. मात्र, यामुळे नगरपंचायतीचे दैनंदिन कामकाजच व्यवस्थित सुरू ठेवण्याचा निकाराने प्रयत्न करता येत असल्याची भावना दिसून येत आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नगरअभियंता हे पद रिक्त असल्याने महाड नगरपरिषदेचे अभियंता सुहास कांबळे हे कामकाज पाहात असून त्यांच्याकडे त्याव्यतिरिक्त 3 नगरपंचायतींची जबाबदारी असल्याने पोलादपूर नगरपंचायतीच्या बांधकाम परवानगी देणे व इतर बांधकामविषयक कामकाजाला खीळ बसली आहे.
लिपिक टंकलेखक मंजूर 5 पदांपैकी 4 पदे रिक्त असल्याने बांधकाम विभाग, करविभाग, लेखाविभाग, आरोग्यविभाग आणि नळपाणीपुरवठा विभाग या विभागांची जबाबदारी एकाच लिपिकावर येत असून संबंधित विभागांच्या कामकाजातील समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार 19 कर्मचारी असण्याची गरज स्पष्ट झाली आहे. यापैकी तीन कर्मचारी लिपिक रूपेश जाधव, शिपाई प्रमोद शिंदे आणि व्हॉल्वमन यशवंत मोरे यांचे पोलादपूर नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यात आले असून बाळा पार्टे, रमेश जगताप, वाहन चालक दिलीप पार्टे, सफाई कामगार निलेश मोरे, शालीनी सोनवणे आणि निकिता निकम या 6 कर्मचाऱ्यांची अवस्था समावेशनाअभावी ग्रामपंचायतीचेही नाही आणि नगरपंचायतीचेही नाही अशा त्रिशंकू स्वरूपाची झाली आहे.
समावेशनाअभावी नगरपंचायतीचे कर्मचारी होऊ न शकलेले पोलादपूर ग्रामपंचायतीचे जुने अनुभवी कर्मचारी लिपिक गणपत मोरे, सफाई कर्मचारी जयश्री मोरे व आता पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत जगताप यांच्या सेवानिवृत्तीनंतर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांसाठी नगरपंचायत प्रशासन आणि राज्यकर्ते शासनाकडे पाठपुरावा करताना आकृतीबंधानुसार सर्व 12 रिक्त पदे भरण्याची मागणी कोण करणार याकडे पोलादपूरवासियांचे लक्ष लागले आहे.
पोलादपूर नगरपंचायतीची नगररचना, अग्निशमन यंत्रणा, कचरा व्यवस्थापन, फिल्टरेशन प्लांट, बांधकाम आणि अंतर्गत रस्ते तसेच अन्य महत्वाच्या भविष्यातील विकासाच्या कामांचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण कर्मचारी क्षमता असण्याची गरज स्पष्ट दिसून येत असून वेळप्रसंगी इमारतींच्या वैध व अवैधतेची नोंद करण्यासाठी खासगी एजन्सीजची नियुक्तीही करण्याची आवश्यकता भासणार आहे. मात्र, हे सर्व परस्पर संबंधित विषय एकमेकांमध्ये गुंतलेले दिसून येत असून तूर्तास कर्मचाऱ्यांची भरती केल्याखेरिज पोलादपूरकरांना नागरी सुविधांमधील उणिवांतून सुटका होणे अशक्य आहे. सर्व अनिश्चिततेच्या गर्तेतून समावेशन झालेले लिपिक रूपेश जाधव, शिपाई प्रमोद शिंदे, जितेंद्र बनसोडे, आणि व्हॉल्वमन यशवंत मोरे आणि समावेशन न झालेले कर्मचारी बाळा पार्टे, रमेश जगताप, वाहन चालक दिलीप पार्टे, सफाई कामगार निलेश मोरे, शालीनी सोनवणे आणि निकिता निकम यांनी प्रमोद ढसाले यांच्या उपस्थितीत चंद्रकांत जगताप यांना भावपूर्ण निरोप दिला.
Related