पोलादपूर ( शैलेश पालकर ) : तालुक्यातील देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील लहुळसे गावाच्या जंगल भागातील झाड तोडण्यासाठी शनिवारी सकाळी गेलेला व्यक्ती दुपारी जेवायला घरी परत आला नसल्याने लोकांनी शोधाशोध केली असता तो एका झाडाच्या खाली गतप्राण अवस्थेत आढळून आला.
लहुळसे येथील नारायण रावजी माचुत्रे (वय-56 वर्षे) हे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्यापूर्वी घरातून जंगलभागातील झाड तोडण्यासाठी गेले असता दुपारी जेवायला घरी परत आले नाहीत. यामुळे त्यांच्या गावांतील लोकांनी शोध घेतला असता जंगलातील झाडाखाली फांदीवरून निसटून जमिनीवर डोक्यावर आपटून मार लागल्याने मृतावस्थेत ते आढळून आले.
याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांचा मुलगा उत्तम नारायण माचुत्रै याने फिर्याद दिली असून पोलीस हवालदार पवार हे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. मयत नारायण माचुत्रे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये करण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 25-2023 मध्ये सीआरपीसी 174 नुसार नोंद करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यात कोवळू तोडणे म्हणजे नवीन पालवी फुटण्यासाठी झाडांच्या जुन्या फांद्या तोडून शेतामध्ये राब पेटविण्यासाठी रचण्याचा हा कालावधी असून अनेक शेतकरी या काळात जंगलातील झाडांच्या फांद्या तोडून शेतामध्ये आणून राब पसरवित असतात. यामुळे कधी जंगलातील झाडाच्या फांद्यां विजेच्या खांबाला चिकटून असल्यास शॉक बसून तर कधी अचानक तोल जाऊन कोसळून मृत होण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात.