पोलादपूरचा राजा विसर्जन मिरवणूक : दिमाखदार सोहळ्यात गणरायाला निरोप

पोलादपूर राजाची दिमाखदार विसर्जन मिरवणूक

पोलादपूर पोलीस स्टेशनचा राजाही पौर्णिमेला मार्गस्थ 

पोलादपूर (शैलेश पालकर) :
अनंत चतुर्दशीला विविध ठिकाणचे सार्वजनिक व खाजगी गणेश मूर्तींचे विसर्जन सुरू असताना पोलादपूर शहरातील पोलादपूर चा राजा सार्वजनिक गणेशमुर्तीची विसर्जन मिरवणुक दिमाखदार सोहळा ठरली. रविवारी पोलादपूर पोलीस स्टेशनच्या राजा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
पोलादपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष दर्पण दरेकर, कार्याध्यक्ष स्वप्निल भुवड, उपाध्यक्ष सनी विचारे व महेश निकम, सचिव अमरदीप नगरकर, सहसचिव प्रवीण पांडे, खजिनदार प्रतीक सुर्वे, सह खजिनदार आदेश गायकवाड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे असंख्य कार्यकर्ते व माजी पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका नेते प्रसन्न पालांडे, तालुका अध्यक्ष वैभव चांदे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, समाजासेवक दीपक हरीभाऊ उतेकर, नगरसेवक विनायक दीक्षित, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नगरसेवक दिलीप भागवत, मनसे शहर उपाध्यक्ष मुश्ताक मुजावर यांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मिरवणूक सद्भावनेसह पार पाडण्यात मदत केली.
27 ऑगस्ट रोजी हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात पोलादपूरचा राजा सार्वजनिक गणेशमुर्तीची विधीवत स्थापना झाल्यानंतर रांगोळी स्पर्धा, पबजी स्पर्धा, संगीत भजन, श्री काळकाई माता नृत्य पथक कोतवाल बुद्रुक यांचे सादरीकरण, श्री सत्यनारायणाची महापूजा व अल्पोपहार, अथर्वशीर्ष पठण, आदिशक्ती भजन मंडळ, मोदक स्पर्धा, देणगीदार व हितचिंतक यांच्या सत्कार तसेच पोलादपूरचा राजा जीवनगौरव पुरस्कार, महाप्रसाद, 101 ताटांचा नैवेद्य अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीमध्ये चोचिंदे येथील लेझीम पथकाचे शिस्तबद्ध सादरीकरण झाले. 
डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली तसेच स्थानिक लेझीम पटूंनीदेखील खेळून हौस भागवली. पोलादपूर शहरातील पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर लेझीमसह मिरवणूक आल्यावर गुरु संतोष भुवड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या तरुण तरुणींचे शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले.  यानंतर मुस्लीम समाजबांधवांनी पोलादपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दर्पण दरेकर यांचा सत्कार करुन सर्व गणेशभक्तांना शीतपेयांचे मोफत वाटप केले. रात्री उशिरापर्यंत श्रीगणेश विसर्जन मिरवणूक महाबळेश्वर रस्त्यावरून बाजारपेठेत व गांधी चौकातून जुना महाबळेश्वर रस्त्यावरून श्रीगणेश विसर्जन घाटापर्यंत लेझीम, खालुबाजा, डिजे आणि तरुण तरुणींच्या बेभान नृत्याविष्कारासह मार्गस्थ झाली आणि सर्वांनी उत्तरवाहिनी सावित्री नदीच्या पात्रात पोलादपूरच्या राजाचे सामुदायिक महाआरती करून विसर्जन करीत निरोप दिला.
यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद रावडे आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवीत सहकार्य केले.
रविवारी सायंकाळी पोलादपूर पोलीस स्टेशनचा राजा गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस व महिला पोलीसांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन बाप्पाला निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *