पेण शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये ट्रान्सफॉर्मर बाद; नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या पाठपुराव्याने अवघ्या काही तासात नव्या ट्रान्सफॉर्मरची तातडीने उभारणी

पेण | प्रतिनिधी 
पेण शहरातील म्हाडा वसाहतीला लागून असणाऱ्या प्रभाग क्रमांक एक मधील कुंभार आळी, समर्थ वाडी येथील एका ट्रान्सफॉर्मर वरील अती भरामुळे काल रात्री ( 24 मे ) अकाराच्या सुमारास सदर ट्रान्सफॉर्मर बाद झाल्याची घटना घडली. त्यानंतर ही घटना समजताच पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी तातडीने विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर ठिकाणी नव्या ट्रान्सफॉर्मरची उभारणी करण्याची सूचना केल्यानंतर आज त्या ठिकाणी नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.
वाढत्या उन्हाच्या झळांमुळे सध्या सर्वच वीज ग्राहकांचा वीज वापर वाढला आहे. त्याचाच परिणाम आज पेण शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील कुंभार आळी समर्थ वाडी येथील एका ट्रान्सफॉर्मर वरील वाढत्या भारामुळे सदर ट्रान्सफॉर्मर बाद झाल्याच्या घटनेत पहायला मिळाला आहे.220 के. व्हि. ए. क्षमता असणाऱ्या या ट्रान्सफॉर्मर वर जवळपास 270 वीज ग्राहकांचा लोड असल्याने आणि त्यातच वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता ग्राहकांचा वापर वाढल्याने हा ट्रान्सफॉर्मर बाद झाला असल्याचे पेण विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम यांनी सांगितले.
काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला काही तांत्रिक अडचण असेल असा अंदाज ग्राहकांनी वर्तविला. मात्र त्यानंतर काही तासांनी येथील स्थानिक ग्राहक समाजसेवक हितेश पाटील यांनी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या कानावर हा प्रकार घातल्यानंतर तातडीने प्रितम पाटील यांनी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना केल्या आणि त्यांच्या सूचनेनुसार आज हा नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असताना स्वतः नगराध्यक्षा प्रितम पाटील आणि महिला व बालकल्याण सभापती तथा येथील स्थानिक नगरसेविका कलावती पाटील यांनी भर उन्हात उभे राहून सदर ट्रान्सफॉर्मर बसवून घेतल्याने वीज ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र तरी देखील हीच समस्या पुन्हा एकदा भेडसावू नये यासाठी आणखी एक ट्रान्सफॉर्मर या भागासाठी वाढविण्यात यावा अशी मागणी स्थानिक वीज ग्राहकांनी केल्यानंतर तशा प्रकारच्या सूचना देखील नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी वीज पुरवठा अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
———————————————-
प्रभाग एक मधील ट्रान्सफॉर्मर बाद होऊन विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना रात्री हितेश पाटील यांच्याकडून समजल्यानंतर मी तातडीने विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून तत्परतेने काम करण्याच्या सूचना केल्या. पेण शहरातील प्रभाग एक मध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली विकासकामे पाहता याठिकाणी अनेक लोकवस्ती वाढत चालली आहे, त्यामुळे याठिकाणी नागरिकांच्या वाढत्या लोकवस्तीनुसार आणि त्यामुळे वीजेचा वाढता वापर लक्षात घेता या भागात आणखी एक ट्रान्सफॉर्मर ची गरज असल्याने लवकरच या भागात तो बसविण्यासाठी आमचा पाठपुरावा असेल आणि नागरिकांच्या मागणीनुसार विद्युत मंडळाच्या मार्फत आणखी एक नवीन ट्रान्सफॉर्मरची नक्कीच उभारणी केली जाईल.
…प्रितम पाटील, नगराध्यक्षा – पेण न. पा.
———————————————-
प्रभाग एक मधील ट्रान्सफॉर्मर बाद झाल्यानंतर काम करत असताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी या भागातील वीज ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता सदर नव्या बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर ची क्षमता वाढवा किंवा आणखी एक नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी केली आहे, त्याप्रमाणे आम्ही पुढे प्रस्ताव पाठवत असून मंजुरी आली की त्यांच्या मागणीनुसार ते काम करून यातील वीज ग्राहकांची समस्या दूर करणार.
…आशिष मेश्राम, सहाय्यक अभियंता, पेण विद्युत मंडळ