पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदान मंजूर

Suhit jeevan trust

PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
रायगड जिल्ह्यातील पेण येथे स्थित सुहित जीवन ट्रस्ट संचलित एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या मतिमंद विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेस ७५ अनिवासी विद्यार्थ्यांसाठी अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
सुहित जीवन ट्रस्टतर्फे हे प्रशिक्षण केंद्र मार्च २०१२ पासून यशस्वीरित्या चालवले जात आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या १६ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार, अनुदानासाठी संस्थेचे किमान १५ वर्षांचे कार्यकाल आवश्यक आहे. मात्र, सुहित जीवन ट्रस्टच्या उपक्रमाची विशिष्ट गरज लक्षात घेऊन ही अट शिथिल करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे केंद्रातील ७५ अनिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक आणि शिक्षकेत्तर अशा १४ पदांना मान्यता देण्यात आली असून, यासाठी दरवर्षी येणाऱ्या ५८ लाख ३७ हजार ९०८ रूपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यवसाय प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या आत्मनिर्भरतेस चालना मिळणार आहे.

Nca1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *