पेण मंदिर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश ! अलिबागचा सिरीअल चोर जेरबंद

पेण मंदिर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश ! अलिबागचा सिरीअल चोर जेरबंद
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
पेण शहरातील साई मंदिरातून समई व घंटा चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावत पेण गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल ५ दिवसांच्या अथक तपासानंतर आरोपीला खारपाडा येथे एस.टी. बसमधून अटक केली. आरोपीने पेणसह रायगडातील अन्य मंदिरांतूनही चोरी केल्याची कबुली दिली आहे.
प्राप्त महितीनुसार, दि. 20 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 दरम्यान साई मंदिर, कासार तलाव, पेण येथे चोरीचा प्रकार घडला होता. मंदिरातील एक समई व दोन घंटा चोरीस गेल्याने पेण पोलीस ठाण्यात BNS 305(D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील 15 ठिकाणचे CCTV फुटेज तपासून एक अनोळखी आरोपी दिसून आला. त्याने गुन्ह्यानंतर पेण S.T. स्थानकातून पनवेलकडे प्रस्थान केले असल्याचे आढळले.
या आधारे तपास पथकाने आरोपीचा मागोवा घेतला असता तो रेवदंडा येथील महेश नंदकुमार चायनाखवा असून तो अलिबाग कारागृहातून नुकताच सुटल्याचे निष्पन्न झाले. त्याचा फोटो CCTV फुटेजसोबत जुळवला असता, साम्य दिसून आल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अखेर तांत्रिक पद्धतीने पत्ता शोधून दि. 25 जुलै रोजी खारपाडा येथे आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने पेण, वडखळ, रोहा, दादर सागरी व कोलाड येथील मंदिरांतून समई व घंटा चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  
सदर गुन्ह्याच्या उकल करण्यात सपोनी निलेश राजपूत, ASI राजेश पाटील, HC सुशांत भोईर, HC प्रकाश कोकरे, HC अजिंक्य म्हात्रे, HC सचिन वस्कोटी, PN अमोल म्हात्रे, PC गोविंद तलवारे व PC संदीप शिंगाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा अधिक तपास पो.नि. संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *