पेण ( राजेश प्रधान ) : पेण शहरातील मुख्य रस्त्याची, गटारे व दुभाजकांची स्वच्छता करून स्वच्छ सुंदर करण्याच्या दृष्टीने पेण नगर परिषदेने शुक्रवार दिनांक 9 रोजी शहर स्वच्छता अभियान राबवून शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ केले.
पेण नगरपरिषदेचे मुख्य प्रवेशव्दारापासून धरमतर रोड येथे स्वच्छता अभियानास सुरूवात करण्यात आली. सदर अभियाना अंतर्गत रस्त्यालगत असलेली गटारे स्वच्छ करण्यात आली, तसेच दूभाजक लगत साठलेली माती काढून दुभाजक स्वच्छ करण्यात आले.
आवश्यक त्या ठिकाणी स्टील ट्वीनबीन बसविण्यात आले, अतिरीक्त वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात आली. विद्युत पोल सुस्थितीत करण्यात आले. रस्ता रुंदीकरणामध्ये व्यवसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा औषध फवारणी करण्यात आली. रस्त्यालगतची गटारांची माती उचलण्यात आली. तसेच जेसीबीच्या मदतीने सपाटीकरण करण्यात आले. सदर अभियानात मुख्याधिकारी जिवन पाटीलसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
या स्वच्छता अभियानकरीता १ जेसीबी, १ ट्रॅक्टर व पेण नगरपरिषदेचे ६० कायम व कंत्राटी सफाईकामगारांच्या मदतीने स्वच्छता करण्यात आली. या अभियानात पेण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी ०.८० कि.मी. रस्ता स्वच्छ करण्यात आला. तसेच ३ टन कचरा गोळा करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आंबेगाव येथे वाहतूक करण्यात आला.