पेण तालुक्यातील मौजे वरप येथे वडखळ पोलिसांनी कारवाई करत एका ७८ वर्षीय व्यक्तीकडून सुमारे १२ हजार २५० रुपये किमतीचा २४५ ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या राहत्या घराच्या शेडमध्ये काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले व फळे असलेला, ओलसर स्वरूपाचा आणि उग्र वास येणारा वनस्पतीजन्य पदार्थ आढळून आला. तपासणीअंती तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. एकूण २४५ ग्रॅम वजनाचा गांजा, किंमत १२,२५० रुपये, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपीचे नाव लक्ष्मण महादू मनवे (वय ७८) असून तो वरप, ता. पेण, जि. रायगड येथील रहिवासी आहे. आरोपीने हा गांजा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचा मुलगा हा भाजपशी संबंधित ग्रामपंचायतीचा सरपंच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे या कारवाईने पेण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या चर्चेची अधिकृत पुष्टी झालेली नसून, आरोपीला या प्रकरणातून कोणतीही मदत अथवा संरक्षण मिळते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.