पेण तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून आगरी समाज सभागृहात आयोजित आमसभेत स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार रवीशेठ पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांना निर्देश देऊन उपाययोजना ठरवण्यात आल्या.
मुंबई-गोवा महामार्गामुळे नैसर्गिक निचरा बंद झाल्याने पूरस्थिती उद्भवत असल्याचे कांदळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच मुरलीधर भोईर यांनी निदर्शनास आणून दिले. सोनखार ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप म्हात्रे यांनी ड्रोन सर्वेक्षणाची माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच जलजीवन मिशनच्या टाकीचे काम अद्याप सुरू झाले नाही, याकडे लक्ष वेधले. अॅड. अच्युत पाटील यांनी एमएमआरडीच्या माध्यमातून 88 गावांची जमीन संपादन करण्याच्या प्रयत्नांना शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले.
काशिनाथ पाटील यांनी गेल इंडियाच्या पाईपलाइनसाठी जागा घेण्यास विरोध दर्शवला, तर हरिष बेकावडे यांनी आदिवासी वाड्यांना गावठाण दर्जा मिळावा अशी मागणी केली.
शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे खासगी शाळा जादा फी आकारत असल्याचा मुद्दा संदीप पाटील यांनी उपस्थित केला. तसेच खारपाडा आणि जिते गावाजवळील महामार्गावरील खड्डे त्वरित भरावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली. याशिवाय वीज, रस्ते आणि आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले, ज्यावर आमदार व खासदारांच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात आल्या.
या सभेला खा. धैर्यशील पाटील, आ. रविंद्र पाटील, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल सूर्यवंशी, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रसाद म्हात्रे, माजी सभापती स्मिता पेणकर, माजी जि. प. सदस्य डी. बी. पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, आदिवासी खात्याचे प्रकल्प अधिकारी, बाजार समिती सभापती यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.