पेण आणि रोहा स्थानकांचा “अमृत भारत स्टेशन” योजनेत समावेश व्हावा – खासदार सुनील तटकरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

रोहा आणि पेण स्थानकांचा “अमृत भारत स्टेशन” योजनेत समावेश व्हावा : खासदार सुनील तटकरे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
रायगड :
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी रायगड जिल्ह्यातील पेण आणि रोहा रेल्वे स्थानकांचा “अमृत भारत स्टेशन” योजनेत समावेश करण्यासाठी सविस्तर निवेदन रेल्वेमंत्र्यांना सुपूर्द केले. 
खासदार तटकरे यांनी नमूद केले की, पेण आणि रोहा ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. शिवाय या परिसरात गणेशमूर्ती व विविध हस्तकला वस्तूंची मोठी निर्मिती होते, ज्यावर हजारो कारागीरांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. रेल्वे वाहतुकीद्वारे हे उत्पादन राज्यभर पाठवले जात असल्याने स्थानकांचे सशक्तीकरण अत्यावश्यक आहे. “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत देशभरातील १२०० हून अधिक स्थानकांचे आधुनिकीकरण होत असून, प्रवासी सुविधा, सुरक्षा, आणि व्यापार वाढीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पेण तालुका आणि आसपासच्या नागरिकांनी खासदार तटकरे यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. या मागणीमुळे रायगड जिल्ह्याच्या रेल्वे विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे स्थानकांचा दीर्घकालीन विकास, प्लॅटफॉर्म सुधारणा, फूड प्लाझा, डिजिटल बोर्ड, सुरक्षितता आणि स्वच्छतेसाठीचा महत्त्वाचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *