पेण ( राजेश प्रधान ) मुंबई – गोवा महामार्गावरील पेण शहरा नजीक असलेल्या तरणखोप गावाच्या हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्य स्तरीय दक्षता पथकाने अवैध डिझेल तस्करांच्या मुसक्या आवळून ६ डिझेलचे अनधिकृत टँकर जप्त करून सुमारे दिड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मुंबई गोवा महामार्गावर अवैध धंदे करीत असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्यातीलच एक मोठा रॅकेट उघडकीस आला आहे.
या संदर्भात बाबत वृत्त असे की, मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी समोरील मोकळ्या जागेत टँकर क्रमांक एम एच 04 एच एस 2203, टँकर क्रमांक एम एच 02 एफ जी 4753, टँकर क्रमांक एम एस 04 जी एफ 8017, एम एच 04 जी आर 0597, एम एच 34 बी जी 8167, एम एच 46 बी यु 2388 या टँकर मधुन डिझेलची अवैध्यरीत्या वाहतूक व साठवणूक होत असल्याची पक्की खबर मिळाली होती. या नंतर पुरवठा विभागाच्या राज्य स्तरीय दक्षता पथकाने उपनियंत्रक मधुकर बोडके, सहाय्यक नियंत्रक विनायक सावंत, निकम, सुधीर गव्हाणे, प्रकाश पराते, राजू भेले, मच्छिंद्र कुटे, दीपक कदम, विवेक त्रिभुवन, सागर वराळे या पथकाने सापळा रचत तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी येथे पाळत ठेवली.
या ठिकाणी बेकायदेशीर रित्या डिझेल तस्करी करण्यात येत असलेले सहा टँकर व मोहम्मद अली मोहम्मद, लंबे या दोन टँकर चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरचे टँकर हे अलिबाग येथील आरसीएफ कंपनी जवळील समुद्रामधील बोटीतून अवैधरित्या डिझेल घेऊन त्याची तस्करी करीत होते.
याप्रकरणी एकूण एकुण १ कोटी ४३ लाख ६ हजार रुपयांचा डिझेल व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. डिझेल साठवणूक व वाहतुक व्यवसायाचे मालक महंमद अनीस खान व मॅनेजर अब्दुल शेख यांच्यासह इश्तीयाक, राजू पंडित, उस्मान सह ४ टँकर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पेण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 / 420, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 / 3,7,8, पुरवठा नियमन व वितरण व गैर व्यवहार प्रतीबंध 2 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 2/ 2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.