पेण वन परिक्षेत्रातील गागोदे परिमंडळाच्या अधर्णे नियतक्षेत्रातील मौजे वरवणे येथे बेकायदा खैर वृक्षतोड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने पहाटेच्या सुमारास कारवाई केली. वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच खैर लाकूड वाहनात भरत असलेले संशयित जंगलाच्या दिशेने पसार झाले. या कारवाईमुळे खैर वृक्षतोडीचे प्रकरण उघडकीस आले आहे.
प्राप्त महितीनुसार, बुधवारी (२६ ऑगस्ट) पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास वनपाल गागोदे, वनरक्षक जावळी, धामणी उत्तर, कामार्ली तसेच वाहनचालक यांनी मौजे वरवणे कडे जाणाऱ्या रस्त्यावर अंतिम संपादित गट क्रमांक ६८-अ परिसरात पाहणी केली. यावेळी काही व्यक्ती वाहनामध्ये खैर जातीचा लाकूडमाल भरत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच संबंधित व्यक्तींनी घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने पलायन केले.
वनविभागाच्या तपासणीदरम्यान महिंद्रा कंपनीची झायलो कार (क्र. MH 46/D 1318) ताब्यात घेण्यात आली असून, चौकशीकामी वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच खैर जातीचे ४ नग, एकूण ०.१०१ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, खैर वृक्षतोडीमागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.