पेणमध्ये खाकीवर डाग! महिला पदाधिकाऱ्याला अश्लील मेसेज; पोलिस हवालदार निलंबित

अलिबागमध्ये 1.5 कोटींची फसवणूक; आज दोघे दीड कोटींसह जेरबंद, आता पर्यंत पोलिसांसह एकूण 6 जण अटकेत
रायगड | अमुलकुमार जैन
पेण पोलीस ठाण्यातील गैरवर्तनाच्या गंभीर प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महिला पदाधिकाऱ्याला अश्लील संदेश पाठविल्याच्या आरोपावरून पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, एका अधिकाऱ्याचाही सहभाग समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पेण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदाराने महिला पदाधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६ रोजी संबंधित हवालदाराने मद्यप्राशन करून महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला व्हॉट्सअॅपद्वारे अश्लील संदेश पाठविले. एवढेच नव्हे, तर त्यांनी संबंधित महिलेला वारंवार कॉल करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षकांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाई करत संबंधित हवालदाराला निलंबित केले आहे.
निलंबनाच्या काळात संबंधित कर्मचाऱ्याला नियंत्रण कक्षात दररोज हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले असून, मुख्यालय सोडण्यासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच शासकीय साहित्य जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी सुरू असून अंतिम निर्णय होईपर्यंत निलंबन कायम राहणार आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या कामकाजाबाबतही पोलीस वर्तुळात चर्चा रंगत असल्याचे समजते. काही ठिकाणी गैरप्रकारांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा असून, हवालदाराच्या सेवेवरही यापूर्वी प्रश्न उपस्थित झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या सर्व बाबींना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
या घटनेमुळे केवळ संबंधित कर्मचाऱ्यांवरच नव्हे, तर संपूर्ण पोलीस विभागाच्या शिस्तीवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.