महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या अधिपत्याखाली तालुका क्रीडा संकूल समिती, पेण यांच्या मार्फत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी खास क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १५ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत तालुका क्रीडा संकूल पेण, गोविंद बाग येथे सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांकडून दिले जाणार आहे. यामध्ये खेळाडूंना मोफत गणवेष उपलब्ध करून देण्यात येणार असून, खेळामधील कौशल्यांचा शोध घेण्यासाठी “टॅलेन्ट हंट” योजनेच्या माध्यमातून प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना वर्षभर मोफत आणि नियमित प्रशिक्षण देण्याचा मानस समितीने व्यक्त केला आहे, जेणेकरून ते राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकतील.
शिबिराच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवणे, संघभावना, नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, सार्वजनिक बोलणे, भावनिक बुद्धिमत्ता, सहानुभूती आणि वेळेचे व्यवस्थापन आदी जीवन कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक विद्यार्थी खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज तालुका क्रीडा संकुल पेण येथे सादर करावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.