पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही नेरळ ग्रामपंचायतीकडून अद्याप नालेसफाईची कामे पूर्णपणे करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी मुसळधार पावसामुळे नेरळ शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडतात. मात्र यावर्षीदेखील प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नेरळ बाजारपेठ, पायरमाळ, चिचंआळी, मोहाचीवाडी, खांडा परिसर, स्टेशन रोड, गंगानगर, मातोश्रीनगर तसेच अंतर्गत वाड्या-वस्त्यांमधील अनेक नाले गाळ आणि कचऱ्याने तुंबलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी झुडपे वाढल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की, दरवर्षी नेरळ ग्रामपंचायतीकडून मानसूनपूर्व नालेसफाईचे नियोजन जाहीर केले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नालेसफाई ही अर्धवट राहते. यामुळे डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. तर तोंडावर पावसाळा आला असताना, मात्र सध्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील परिसरातील नालेसफाई ही झाली नसल्याचे वास्तव हे समोर येत असल्याने, मानसूनपूर्व तयारीचा नेरळ ग्रामपंचायतीला विसर पडाला का? असा प्रश्न हा नेरळच्या सामान्य करदात्यांकडून उपस्थित केला जात आहे.
तर नागरिकांकडून नेरळ ग्रामपंचायतीने तातडीने सर्व भागांतील नालेसफाई पूर्ण करून संभाव्य पूरस्थिती व नागरिकांच्या आरोग्याविषयक निर्माण होणारा प्रश्न टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, गटारे साफ करणे आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
————————————
नेरळ मधील नालेसफाईची वर्क ऑर्डर ही झाली असुन, सोमवार पासून नेरळ मधील नालेसफाईला सुरवात ही नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येईल.