राज्यभर सुट्ट्यांचा हंगाम सुरु असतानाच पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अरबी समुद्रात वसलेला मुरुड जंजिरा किल्ला येत्या २६ मे २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस होणाऱ्या समुद्राच्या उधाणामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिडाच्या बोटींमधून किल्ल्यावर उतरताना होणाऱ्या अडचणी आणि वाढलेल्या लाटा लक्षात घेता हा निर्णय अनिवार्य होता.
किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये अजिंक्य किल्ला म्हणून ओळख असलेल्या जंजिराबद्दल मोठे आकर्षण आहे. जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. २२ एकरवर उभा असणाऱ्या जंजिऱ्यावर १९ बुरुज आहेत. पूर्वी ५१४ तोफा होत्या. त्यातील मोजक्याच दिसून येतात इतिहासात जंजिरा हा “अजिंक्य किल्ला” अशी नोंद असल्याने जंजिरा पाहण्याचे पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण दिसून येते. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे.
पावसाळा संपल्यानंतरच नवीन जेट्टी कार्यान्वित होणार असल्याने, पर्यटकांनी संयमाने निर्णयाचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जंजिरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील बोट चालक, लाँच मालक यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. त्यामुळे जंजिरा खुला असणे गरजेचे आहे. असे त्यांचे मत आहे.
—————————————–
समुद्रातील सुरक्षिततेच्या कारणास्तव दरवर्षी जंजिरा जलदुर्ग 25 किंवा 26 मे पासून पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद केला जातो. पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची आहे. या कालावधीत समुद्राच्या मोठ्या लाटा उसळत असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शासकीय स्तरावरून निर्णय घेतला जातो. 26 मे पासून जंजिऱ्याचे दरवाजे बंद करावेत अशा स्वरूपाचे आदेश मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व खात्याला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
…बजरंग येलीकर, पुरातत्व विभाग अधिकारी, अलिबाग- मुरुड