पाली-भूतवली धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू; डोळ्यात अश्रू आणणारी घटना, पाळीव कुत्र्याची भावनिक प्रतिक्रिया

पाली-भूतवली धरणात दोन तरुणांचा बुडून मृत्यू; डोळ्यात अश्रू आणणारी घटना, पाळीव कुत्र्याची भावनिक प्रतिक्रिया
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाली-भूतवली धरण परिसरात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गोवंडी (मुंबई) येथील इब्राहिम आझीज खान (वय २४) आणि खलील अहमद शेख (वय २४) या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम, खलील आणि त्यांचा मित्र हितेश जितेंद्र कांदू (वय २५) हे तिघे आणि त्यांचा एक पाळीव कुत्रा, १८ मे २०२५ च्या रात्री सुमारे तीनच्या सुमारास माथेरानला एक दिवसीय सहलीसाठी रवाना झाले होते. वाटेत त्यांनी पाली-भूतवली धरण परिसरात विश्रांतीसाठी थांबले. पहाटे साडेपाचच्या दरम्यान, तिघे तरुण धरणात अंघोळीसाठी उतरले. मात्र, काही क्षणातच इब्राहिम आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गटांगळ्या खात बुडू लागले.
ही घटना पाहताच हितेश कांदू तातडीने बाहेर आला व मदतीसाठी स्थानिक नागरिकांना पाचारण केले. स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले. सकाळी साडेसहाच्या सुमारास हितेशने नेरळ पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक भास्कर गच्चे, पोलिस शिपाई गणेश पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या पाळीव कुत्र्याने त्यांच्याकडे पाहून अश्रू ढाळले. ही दृश्य पाहून खुद्द पोलिस अधिकाऱ्यांच्या देखील डोळ्यांत पाणी आले.
दोन्ही मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, धरण परिसरात माती माफियांनी अवैध माती उपशामुळे मोठे खड्डे निर्माण केले आहेत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना याची माहिती नसल्याने अशा दुर्घटना घडतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *