पाणीपुरवठा विभागच पाण्यात! शासकीय कार्यालयांच्या जलकोंडीवर मनसेचा एल्गार; तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन

शासकीय कार्यालयांच्या जलकोंडीवर मनसेचा एल्गार
माणगांव | नरेश पाटील
पावसाळ्यात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना माणगांव शहरातील जुन्या पंचायत समितीच्या आवारात पावसाचे पाणी साचून अक्षरशः तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. याच परिसरात तालुका पाणीपुरवठा विभाग आणि तालुका आरोग्य विभागासारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये कार्यरत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मनसेचे माणगांव तालुकाध्यक्ष चिमन सुखदरे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, शासकीय कार्यालयांच्या परिसरात अनेक दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या तालुका पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाचीच अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, कर्मचाऱ्यांनाही जलमय आणि अस्वच्छ वातावरणात काम करावे लागत आहे. यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चिमन सुखदरे यांनी तात्काळ पाणी काढून परिसराची स्वच्छता, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा त्यांनी दिला. आता प्रशासन तातडीने कृती करते की मनसेच्या आंदोलनाला सामोरे जाते, याकडे संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.