पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; ‘पशुसंवर्धन KCC’ योजनेतून ३ लाखांपर्यंत कर्ज

अलिबाग | अमुलकुमार जैन
राज्यातील पशुपालकांना आर्थिक बळ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ (KCC) मोहीम सुरू केली आहे. या योजनेद्वारे पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यवसाय विस्तारासाठी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पशुपालकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून उत्पादनवाढीसही चालना मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना १.६० लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे. तसेच दूध संस्थेची हमी असल्यास ही कर्जमर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढवता येणार आहे. आधीच किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या गरजेनुसार पतमर्यादा वाढवून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्जाचा मूळ व्याजदर ९ टक्के असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सवलतींमुळे व्याजदरात मोठी कपात होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन’ पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच कर्जाची परतफेड एक वर्षाच्या आत करणे बंधनकारक आहे. राज्यातील सुमारे १० लाख पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी १९६२ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात चौकशी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.