पनवेल परिसरात गुन्हेगारी घटनांचा सुळसुळाट : स्कुटी चोरी, रिक्षा चालकावर हल्ला आणि डिझेल चोरीच्या घटना उघडकीस

पनवेल परिसरात गुन्हेगारी घटनांचा सुळसुळाट : स्कुटी चोरी, रिक्षा चालकावर हल्ला आणि डिझेल चोरीच्या घटना उघडकीस

पनवेल (संजय कदम) : 
पनवेल शहरात मागील काही दिवसांत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी आणि हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
१. होंडा अ‍ॅक्टीव्हा स्कुटीची चोरी
पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँडजवळ उभी करून ठेवलेली केतन गोसावी यांची काळ्या रंगाची होंडा अ‍ॅक्टीव्हा (MH-06-AT-4152) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या स्कुटीची किंमत अंदाजे १०,००० रुपये असून, याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
२. रिक्षा चालकावर ब्लेडने हल्ला
रेल्वे स्टेशन परिसरातील साई मंदिराजवळ, आशिक आलम शेख (३५, रा. नवनाथ झोपडपट्टी) या रिक्षाचालकास चार अनोळखी इसमांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्यामुळे संतप्त आरोपींनी संगनमत करून त्याच्यावर हल्ला केला. हाताने मारहाण केल्यानंतर चेहऱ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. पीडित रुग्णालयात उपचार घेत असून याप्रकरणीही पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
३. टँकरमधून डिझेल चोरी
विजयकुमार अजोरपाल, जे ठाणे जिल्ह्यात राहतात, हे टँकर (MH-43-CE-1688) चालक आहेत. त्यांनी कर्नाटकमधून माल घेऊन तळोजा MIDC परिसरात माल खाली करण्यासाठी येत असताना, एशियन पेंट कंपनीजवळ रात्री गाडीत झोपले होते. सकाळी जागे झाल्यावर डिझेलचा वास येत असल्याचे लक्षात येऊन पाहणी केली असता, टँकरमधून मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी झाल्याचे आढळून आले. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *