पनवेलमध्ये दोन दुचाकींची जोरदार धडक; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने तिघांचे वाचले प्राण

पनवेल | प्रतिनिधी 
पनवेलमधील शिवशंभू नाका-पळस्पे मार्गावर नांदगाव कट येथे दोन दुचाकींच्या अपघातात दोन महिला व एक पुरुष जखमी झाले. वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना खासगी रिक्षातून तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ शकले.
रविवार (१२ जुलै) रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास गाढी नदीपुढे कोस्ट गार्ड इमारतीसमोरील नांदगाव कट येथे दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच शिवशंभू सिग्नल येथे वाहतूक नियमन करत असलेले पोलीस हवालदार अमीर मुलाणी आणि पोलीस शिपाई सुरेश जौंजाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने कोणताही विलंब न करता ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता जखमी दोन महिला आणि एका पुरुषाला खासगी ऑटो रिक्षातून पनवेल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले.
त्यानंतर अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली असता तिघांचीही प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता, कर्तव्यदक्षता आणि मानवतावादी भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.