भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ०५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतवर्षात साजरा केला जातो. या औचित्याने नेरळ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर यांच्या वतीने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांच्याकरिता मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन कोकण विभागीय शिक्षक आमदार डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभहस्ते कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले, नेरळ विद्या भवनचे सहाय्यक शिक्षक सचिन अभंगे, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल संचालक डॉ. विवेक भगत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
नेरळ कळंब मार्गावरील लक्ष्मी आयकॉन येथील प्रशस्त सभागृहात सदर वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. उपस्थित शिक्षकांच्यापैकी एकूण ७७ कर्मचाऱ्यांनी इसीजी, एक्सरे, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, नेत्रविकार, अस्थीविकारांवरील उपचारार्थ वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. याप्रसंगी ‘सीपीआर व चोकिंग’ याविषयी आपत्कालीन प्रथमोपचार व्यवस्थापन कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य विमा किती आवश्यक आहे या संदर्भात माहिती देण्यात आली.
अनुक्रमे डॉ. विवेक भगत, डॉ. दिपक सिंग, डॉ. हेमंत इंगोले एमडी फिजिशयन, डॉ. श्रुती शिंदे स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ.मिनिष काटकर अस्थीविकारतज्ञ या वैद्यकीय पथकाने उपस्थित शिक्षक बंधू भगिनींच्या समस्यांचे निराकरण केले.
शिक्षक आमदार डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी आपल्या भाषणात नेरळ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर हे नेरळ नव्हे तर संपूर्ण कर्जत तालुक्यात लोकप्रिय होत चालले आहे. ग्रामीण भागातील तरूणांनी उभारलेली ही वैद्यकीय सेवा विश्वासास पात्र ठरली आहे. यापुढील काळातही येथे येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य लोकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुसज्ज अशी वैद्यकीय सुविधा मिळताना आशेचा किरण ठरले पाहिजे हा विश्वास व्यक्त केला. सेकंडरी स्कूल इम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ‘नेरळ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर’ हे कॅशलेस विमा संरक्षणासाठी लाभाच्या यादीत यावे करिता केलेली मागणी संचालक मंडळाने मान्य केली आहे आहे असे सूतोवाच आमदार म्हात्रे सरांनी यावेळी केले. सहाय्यक शिक्षक सचिन अभंगे यांच्या पुढाकाराने हा भव्य उपक्रम नेरळमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आल्याबद्दल आमदार महोदयांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी विचारमंचावर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, सरपंच महेश विरले, विद्या मंदिर मंडळाचे संयुक्त सचिव विवेक पोतदार, व्यवस्थापक रमेश कुंभार, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष दिलीप म्हसे, कर्जत तालुका अध्यक्ष संतोष कांबरी, खालापूर तालुका अध्यक्ष अनिल बडेकर, जिल्हा प्रतिनिधी शरद कुंभार, सोमय्या विद्यापीठ उपकुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर मगर, शिक्षक नेते डी. के. म्हात्रे सर, हनुमंत भगत, प्रशांत डायरे, संजय पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा सन २०२५-२०२६ वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार राजिप केंद्रशाळा मानिवली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका संज्योती कांबरी यांना जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेश भोईर, विमा सल्लागार राही परब, किसन उपाध्याय, निलेश गायकवाड, डॉ. क्षितिजा ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.