कर्जत ( गणेश पवार ) : कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या बाजूकडील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आता नेरळ बोपेले या जिल्हा मार्गचे काम सुरु आहे.अशात या रस्त्यावरील अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून सर्वाना अतिक्रमणाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या त्यामुळे नागरिकांनी स्वतः हि भूमिका घेतली आहे. दरम्यान गेली ७ वर्षे या अतिक्रमणाचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी लावून धरला होता.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील लोभ्याची वाडी, सुगवे, पिंपळोली नेरळ प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०४ प्रमुख जिल्हा मार्गानेच काम सुरु आहे. यासाठी शासनाने तब्ब्ल ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत या भागातील विकासाच्या वाटा मोकळ्या केल्या होत्या. तर बोपेले हा भाग नेरळ संकुल विकास प्राधिकरणात असल्याने येथील नागरिकीकरण झपाट्याने झाले आहे. अशात सिमेंट काँक्रीटचा रस्ता होत असताना येथील रस्त्याचे अंतर हे मध्यभागापासून ३० मीटर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार येथील रस्त्याच्या बाजूकडील विनापरवानगी अनधिकृत असलेली बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी कोल्हारे हद्दीतील अनधिकृत विनापरवानगी बांधकामाचा विषय गेली ७ वर्षे लावून धरला होता. तर अनेकदा उपसोहन देखील केले होते. नुकतेच २ जानेवारी रोजी केलेल्या उपोषणानंतर प्रशासन हि अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलत आहेत. अशात आतापासून काही नागरिकांनी उदारपणा दाखवत स्वतःचे अनधिकृत बांधकाम काढण्यास स्वतःहून सुरुवात केली आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने तिन नोटिसा देऊन आठ दिवसात अनधिकृत बांधकाम काढण्यास सांगितल होते. त्यानुसार काहीजणांनी अनधिकृत बांधकाम काढण्यास स्वतःच सुरुवात केली असल्याचे समजते.
——————————
कोल्हारे, नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ-कळंब राज्यमार्ग,नेरळ-कशेळे राज्यमार्ग व साईमंदिर बोपेले तलवडे प्रमुख जिल्हा मार्गलगत नियमानुसार जिल्हाधिकारी रायगड व रायगड जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बिल्डिंग व बंगल्यावर तुर्तास कोणतीच कार्यवाहि होणार नाहि. मात्र नेरळ-कळंब,नेरळ-कशेळे राज्यमार्ग रस्त्याच्या मध्यापासून ३७ मिटर अंतरावर विनापरवानगी बांधण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येतील. तसेच साईमंदिर बोपेले तळवडे प्रमुख जिल्हामार्गाच्या मध्यापासून ३० मिटर अंतरावर असलेली विनापरवानगी बांधण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे काढण्यात येतील.
…विजय रामचंद्र हजारे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे