नेरळ पोलिसांची थेट मुंब्रात घुसून चोरट्यांवर धडक कारवाई; टोळी जेरबंद

Neral transfarmer chor
कर्जत | गणेश पवार
नेरळ, कर्जत व खालापूर परिसरात रात्रीच्या अंधारात विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीवर नेरळ पोलिसांनी थेट मुंब्रात घुसून कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी आपल्या पथकासह धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. ही टोळी चालू ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करून गरम ऑइलमधील तांब्याच्या तार काढत असल्याने परिसरात वारंवार वीजखंडित होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
दिनांक १४ जानेवारी रोजी पहाटे कोल्हारे ग्रामपंचायत मालकीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची तार चोरी झाल्याने प्रकरण गंभीर बनले. गुन्हा दाखल होताच नव्याने कार्यभार स्वीकारलेले पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांनी रायगड पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक उभारले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारचा माग काढत नेरळ पोलिसांनी थेट मुंब्रा गाठली. प्रथम एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित आरोपींनाही चोख नियोजनाने अटक करण्यात आली.
या कारवाईत नसीम नसीर साहा, रोजन लतिफ अली, मोहम्मद हनीफ फारुख, इब्राहिम जान मोहम्मद खान आणि जका अल्लाह मोहम्मद इब्राहिम खान या पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. तपासात या टोळीने नेरळ, कर्जत व खालापूर परिसरात ट्रान्सफॉर्मर फोडून चार लाख रुपयांहून अधिक नुकसान केल्याचे उघड झाले असून चोरी केलेल्या तांब्याच्या तारांसह चोरीसाठी वापरलेली कार असा सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या यशस्वी कारवाईमुळे ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले असून रायगड पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *