नेरळ पाडा ते कळंब या मार्गावर असलेल्या जुन्या पेशवाई रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिक व वाहनचालकांना दररोज जिवाशी खेळत प्रवास करावा लागत आहे. या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर पर्यायी रस्ता म्हणून होत असल्याने, सध्या खड्ड्यांचे साम्राज्य व दुरुस्ती अभावी होणारी वाहतूककोंडी ही गंभीर नागरी समस्या बनली आहे. मात्र, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे.
दामत रेल्वे गेट ते कळंब जिल्हा मार्गावरील साई मंदिरापर्यंतच्या दोन किलोमीटर अंतरासाठी मे २०१६ आणि डिसेंबर २०१७ मध्ये साडेचार कोटी रुपये खर्च करून डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात डांबर वाहून जाऊन रस्त्यावर खड्डे तयार झाले. २०१७ मध्ये पुन्हा कार्पेटचे काम झाले तरी ते अल्पकालीन ठरले. यानंतर मंजूर झालेल्या दीड कोटी निधीतून साई मंदिर ते ३५५ मीटर पर्यंतचा सिमेंट काँक्रीट रस्ता व स्ट्रीट लाईटचे काम झाले. परंतु उर्वरित रस्त्याची अवस्था दयनीयच राहिली.
नेरळ पाडा येथील अरुंद रस्ता आणि रेल्वे गेटमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीपासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक व वाहनचालक जुन्या पेशवाई रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करत आहेत. मात्र या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून, नागरिक आणि वाहनचालक यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे.
गेल्या सहा वर्षांपासून या मार्गाकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, नेरळ संकुल विकास धिकरणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
“प्रशासन ही नागरी समस्या सोडवण्यास सुस्त का?” असा प्रश्न आता जनतेकडून वारंवार विचारला जात आहे.
======================
नेरळ संकुल विकास प्राधिकरण विभाग हा बांधकाम व्यावसायीकांकडून बांधकाम परवानग्यान पोटी विकास निधी गोळा करण्यात मशगूल झाला आहे का? तर विकास आराखड्डा, नागरि विकास नियोजन तसेच या नेरळ पेशवाई रस्त्याची झालेली दुरावस्था याचा विसर पडला आहे का? अधिकारी वर्गाची नेमणुक ही नागरि समस्या सोडवण्यासाठी की नुसता महिन्याचा पगार घेण्यासाठी नेमणुक केली गेली आहे का? हे अधिकारी नागरि समस्यांची तसदी घेणार का?