नेरळ पाडा रस्त्याची दुरवस्था! २० जुलैला रस्ता रोको आंदोलनाची घोषणा

Neral pada road
कर्जत (गणेश पवार)
नेरळ – कळंब मार्गावरील साई मंदिर ते कर्जत – कल्याण राज्य मार्गाकडे जाणारा जुना नेरळ पेशवाई रस्ता सध्या दयनीय अवस्थेत असून, रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने नागरिक व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः नेरळ पाडा येथील अरुंद रस्ता व रेल्वे गेटमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना ४० ते ४५ मिनिटे खोळंबा सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांपासून ते रुग्णांपर्यंत सर्वांनाच बसत आहे.
या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नागरिक जुन्या पेशवाई रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करत आहेत. मात्र या रस्त्याची झालेली अक्षम्य दुरवस्था, मोठे खड्डे, आणि काही दिवसांपूर्वी घडलेला वाहन अपघात यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर नेरळमधील सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांनी १६ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध केला व येत्या २० जुलै २०२५ रोजी नेरळ कळंब रस्त्यावरील साई मंदिर परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
गोरख शेप म्हणाले, “आंबिवली रेल्वे गेट ते दामत रेल्वे गेट पर्यंतच्या जुन्या पेशवाई रस्त्याची त्वरित दुरुस्ती झाली, तर कर्जत व बदलापूर मार्गावर वाहतुकीचा ताण कमी होईल. मात्र वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने आता आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही.” हा रस्ता रोको कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नसून, नागरिकांना होणाऱ्या अडचणींमुळे उद्भवलेला लोकशक्तीचा आवाज आहे, असे शेप यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *