
पोलादपूर | शैलेश पालकर
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी महायुतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची मानसिकता ठेवण्याची गरज असून महायुतीचे नेते निर्णय घेतील, त्यानुसार या निर्णयामध्ये बदल होऊ शकेल, असे संकेत देताना रोहयो, खारजमीन व फलोत्पादन मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांनी शिवसैनिकांना ‘एकला चलो’च्या तयारीचे आदेश दिले.
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल पं.स.गणातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ना.भरतशेठ गोगावले व जिल्हा उपसहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षप्रवेश केला. यावेळी सडवली ग्रुपग्रामपंचायतीचे उबाठा सेनेचे उपसरपंच संतोष नारायण जाधव यांनी पूर्ण भावकीसमवेत शिवसेनाप्रवेश केल्यानंतर संभाव्य इच्छुक नेत्याने आवेशात 24 ऑक्टोबरला प्रवेश निश्चित झाला असताना भावकीच्या गैरहजेरीत प्रवेश का घेतला असे व्यासपिठावरील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सुनावल्याने एकच खळबळ उडाली.
पोलादपूर तालुक्यातील उबाठा सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश करताना व्यासपिठावर ना.भरतशेठ गोगावले, जिल्हा उपसहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख संजय मोदी, लक्ष्मण मोरे, अनिल भिलारे, सतीश शिंदे, अनिल पवार, रामचंद्र ढवळे, शौकत तारलेकर, रामचंद्र साळुंखे, अनिल दळवी, शंकर बांदल तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
ना.गोगावले यांनी पुढे, चारवेळा निवडून आल्यानंतर मंत्री पदाच्या जबाबदारीमुळे सर्वपक्षिय कार्यकर्त्यांना विकासासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची अनावर इच्छा असल्याने नजिकच्या काळात जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची मानसिकता ठेऊन सहकार्य करण्याची गरज प्रतिपादन केली.
याप्रसंगी जिल्हा उपसहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी, नगरपरिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची संख्या वाढू शकणार असल्याने जर आपणास उमेदवारी मिळाली नाही तर पक्षहिताला प्राधान्य देऊन प्रचारात सहभागी होणार असल्याची स्पष्टोक्ती केली. यावेळी कळंबे यांनी, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा आणि शेकापक्षाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत देत दोन महिन्यांत राजकीय उलथापालथींना वेग येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांनी प्रवेशकर्त्यांच्या स्वागताचे सूत्रसंचालन करताना प्रत्येकाचा नामोल्लेख केला. यावेळी कोंढवी उबाठा विभागप्रमुख मंगेश मोरे, कोतवाल बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णकांत दरेकर, शाखाप्रमुख नंदकुमार निकम, कोंढवीचे माजी सरपंच अमोल मोरे, रमेश मोरे, नरेश मोरे, हनुमंत पालांडे, शैलेशस मोरे, सहदेव जाधव, सुरेश पवार, लक्ष्मण धोत्रे, जगन्नाथ दरेकर, किशोर मोरे, निरंजन सोनावणे, जय धोत्रे, युवराज धोत्रे, मऊ सिध्दार्थ गमरे, सागर मोरे, राज मोरे, शिवाजी मोरे, रवी मोरे, चंद्रकांत धोत्रे, संतोष जाधव सुरज पवार, मयूर मोरे यांनी मंत्री ना.भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते शिवसेनेच्या धनुष्यबाणाची भगवी पताका खांद्यावर घेत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
यावेळी सडवली ग्रुपग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष नारायण जाधव यांनी उबाठा सेनेतून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काटेतळीचे माजी सरपंच तसेच यापूर्वी दोनवेळा जिल्हा परिषदेची उमेदवारी केलेले नायक मराठा समाजाचे नेते सुनील तुकाराम मोरे यांनी 24 ऑक्टोबरला प्रवेशाची तारिख निश्चित झाली असताना भावकीच्या अनुपस्थितीत का प्रवेश केला, असा आवेशपूर्ण सवाल केल्याने काही काळ खळबळ उडाली. मात्र, मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी यासंदर्भात सुनील मोरे यांची यथोचित समजूत काढल्याने संभाव्य वादावर पडदा पडला.