रमेश धनावडे यांच्या सहाव्या पुस्तकाचा ‘नादखुळा’ प्रकाशन सोहळा नुकताच थाटात पार पडला. साहित्यसंपदा प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये माजी नगराध्यक्ष अलिबाग प्रशांत नाईक, ऍड. प्रसाद पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. राजेंद्र चांदोरकर, सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल म्हात्रे, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नरेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, साहित्यिक ऍड. विलास नाईक, साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे, पूनम रमेश धनावडे, महेश कवळे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव धनावडे यांनी केले. रमेश धनावडे यांच्या निवडक कवितांचे वाचन किरण साष्टे आणि ज्योती बावधनकर यांनी खुमासदार पद्धतीने केले. तसेच वैशाली भिडे यांनी आलेल्या शुभेच्छापत्रांचे रसाळ वाचन केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या भाषणातून रमेश धनावडे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सृजनशील योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या सातत्यपूर्ण लेखन कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. प्रभाकर धनावडे यांनी ‘नादखुळा’ पुस्तकास शुभेच्छा दिल्या.
स्वतः रमेश धनावडे यांनीही बोलताना ‘नादखुळा’ या पुस्तकाच्या प्रवासाबद्दल सांगितले. या नावामागील अर्थ स्पष्ट करत त्यांनी पुस्तकातील काही कविता गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार निलेश जाधव यांनी साकारले असून, प्रस्तावना आणि ब्लर्ब हे ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी लिहिले आहे. अंतर्गत सजावटीचे काम योगेश राणे यांनी केले आहे तर मुद्रित शोधनाचे काम महेश कवळे यांनी अत्यंत बारकाईने पार पाडले आहे. महेश कवळे यांनीच या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालनही केले.
रमेश धनावडे हे एम.कॉम., एल.एल.बी., एम.बी.ए. शिक्षण घेऊन सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे डेप्युटी जनरल मॅनेजर (एच.आर. – कॉर्पोरेट अफेअर्स) म्हणून कार्यरत आहेत. याआधी ‘मनतरंग’, ‘ऊर्मी’, ‘जीवनगाणे’, ‘कवितेच्या सुरातून’, ‘असेच काहीतरी’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘नादखुळा’ या पुस्तकास उपस्थित मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या असून, हे पुस्तक साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपूर्वा धनावडे, तेजल धनावडे, पार्थ पाटील, राजेश्री पाटील आणि इतर अनेकांनी मेहनत घेतली. रायगड व अलिबाग तालुक्यातील साहित्यिक, सुजाण नागरिक, वाचक, आणि रमेश धनावडे यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.