नागोठण्यात वीज प्रश्नांवर तोडगा! महावितरण व नागरिक आमने-सामने; चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागोठण्यात वीज प्रश्नांवर तोडगा! महावितरण व नागरिक आमने-सामने; चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
नागोठणे : 
नागोठणे पत्रकार संघाच्या पुढाकाराने शुक्रवार, ४ जुलै रोजी बाळासाहेब ठाकरे सचिवालयातील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित वीज चर्चासत्राला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच, उपसरपंच, सहायक पोलीस निरीक्षक आणि महावितरण अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्रात नागरिकांनी वर्षानुवर्षे भेडसावत असलेल्या विजेच्या समस्या मांडल्या. महावितरणच्या प्रतिनिधींनी सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देत लवकरच सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
चर्चासत्रात लाईनमन कमी, झंपर उडणे, धोकादायक पोल, बिलामधील तफावत, स्मार्ट मीटरविषयी चिंता, तसेच पावसाळ्यातील दीर्घ विजेअभावी होणाऱ्या त्रासासंदर्भात मुद्दे मांडले. आंबेघर, वेलशेत, वणी, कडसुरे या परिसरात लाईनमनच नसल्याची तक्रार आली. मीटर रीडिंग स्थानिकांकडून घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. महावितरणकडून बालाजी छात्रे आणि सत्येंद्र सिंग यांनी समस्यांना समाधानकारक उत्तरे देत त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.
या चर्चासत्रात अनेक गावकरी, माजी सरपंच, पोलीस अधिकारी, महावितरण कर्मचारी आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागोठणे पत्रकार संघाचे सल्लागार राजेश पोवळे व अध्यक्ष उदय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव महेंद्र माने, सहसचिव मनोहर सपकाळ, प्रसिद्धी प्रमुख रोशन पत्की, सदस्य नारायण म्हात्रेआणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *