नागोठणे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एका धाडसी चोरीची भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका मोबाईल दुकानातून भरदिवसा सुमारे ६२ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा धागा मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘तस्मित इंटरप्रायजेस’ या मोबाईल ॲक्सेसरीज व झेरॉक्स दुकानाचे मालक नसीम इलामी हे जेवणासाठी दुकानाचे शटर अर्धवट खाली करून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करून चार्जिंगला ठेवलेला सुमारे ६२ हजार रुपयांचा मोबाईल हातचलाखीने चोरून नेला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताची हालचाल स्पष्टपणे दिसून येत असून, त्याच्या आधारे नागोठणे पोलीस शोधमोहीम राबवत आहेत.
या घटनेमुळे नागोठणे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने बाजारपेठेत नियमित पोलीस गस्त, प्रभावी सीसीटीव्ही देखरेख आणि कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.