नागोठणे : दि. 02 जानेवारी 2024- नागोठणे विभाग नाभिक तरुण संघाच्या वतीने मंगळवार 02 जानेवारी रोजी रायगड जिल्हा नाभिक समाज संघाचे विश्वस्त भाईसाहेब टके यांच्या निवासस्थानावरून पहाटे 5.30 वा.जिल्हा सचिव महेंद्र माने, जिल्हा सल्लागार शामकांत नेरपगार, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र टके,शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर,सूर्यकांत गायकवाड,उदंड रावकर, बापुमहाराज रावकर,हरिष टके यांच्या प्रमुख उपस्थितीत नागोठणे शहरातुन मशाल मिरवणूक काढून अमर रहे अमर रहे वीर भाई कोतवाल-हिराजी पाटील अमर रहे, वंदे मातरम, भारतमाता की जय अशा घोषणा देत ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात दिपस्तंभावर दिप प्रज्वलित करून भारतीय स्वातंत्र लढ्यात इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणार्या भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या सिद्धगड येथे 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे 6.10 वाजता झालेल्या बलिदान वेळेत आदरांजली वाहण्यात आली.
त्यानंतर 10.30 वाजता बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालयातील ग्रामपंचायत सभागुहात उपसरपंच अखलाक पानसरे,ग्रा.पं.सदस्य सचिन ठोंबरे व संतोष नागोठणेकर,ग्रा.पं.सदस्या शबाना मुल्ला व पूनम काळे इप्ते,मा.सदस्य मोहन नागोठणेकर,सुनील लाड यांच्या उपस्थितीत वीर भाई कोतवालांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी विवेक रावकर,शैलेश रावकर,दिगंबर खराडे,शेखर रावकर,मनोज टके,महेंद्र पवार,मिलिंद गुजर,जगदीश दिवेकर, राजेंद्र माने,मनोज गायकवाड,नितिन माने,गिरीधर दिवेकर,सत्यजित रावकर,अनिल चव्हाण,विलास भोसले,रमाकांत गायकवाड,सुधाकर टके, शंकर चव्हाण,दिपक पवार,महेंद्र जाधव,अमित मोरे,रूपेश साळुंखे,ऋत्विज माने यांच्यासह विद्या रावकर,दीपाली टके,कल्पना टके,उषा जाधव, नम्रता माने,सेजल खराडे तसेच विभागातील नाभिक समाज बांधव उपस्थित होते.यावेळी बापुमहाराज रावकर यांनी वीर भाई कोतवाल यांचा इतिहास नवीन पिढीला समजण्यासाठी त्यांचा पाठ्यपुस्तकात धडा असावा अशी मागणी महाराष्ट्रातील समाज बांधवांनी शासनाकडे करून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी दिगंबर खराडे यांनीही वीर भाई कोतवालांचा थोडक्यात इतिहास सांगितला.
नाभिक समाजात जन्मलेल्या भाई कोतवालांनी आपल्या गरीबीवर मात करीत एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. व ब्रिटिश सरकारमध्ये काही काळ नोकरी पत्करली. परंतु देश स्वातंत्र व्हावे, म्हणून नोकरी सोडून ‘जगेन तर स्वराज्यासाठी नाहीतर स्वर्गात’ अशी गर्जना करून महात्मा गांधींच्या करेंगे या मरेंगेच्या लढ्यात स्वता:ला झोकून दिले व आपला क्रांतिवीर गट स्थापन केला.
या चळवळीत भाई हिराजी पाटील यांच्यासह भूमिगत होऊन आगरी व कातकरी समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन ब्रिटीशांविरुद्ध लढू लागले. त्यांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून त्यांची झोप उडवून ब्रिटीशांना वेडावून सोडले. त्यामुळे चिडलेल्या ब्रिटीशांनी भाईंना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. या काळात भाई आपल्या साथीदारांसह सिद्धगडच्या जंगलात वास्तवी करीत असत. परंतु त्याची कुणकुण नव्हती तरीही फितुरी झाली व भाई लपून बसलेल्या सिद्धगडला 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे ब्रिटीशांचा वेढा देवून ब्रिटीशांनी अंदाधुंदी गोळीबार केला.त्यात आपल्या साथीदारांसह हिराजी पाटील व भाईंच्या शरीराची चाळण झाली. भाई व हिराजी पाटील धारातीर्थ पडले. दर वर्षी 2 जानेवारी रोजी सिद्धगड येथे भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदान ठिकाळी पहाटे 6.10 वाजता महाराष्ट्र सरकारच्या प्रतींनिधीच्या उपस्थितीत हजारों देश प्रेमींच्या साक्षीने मानवंदना देवून आदरांजली वाहण्यात येत असते.