आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; 200 कोटींचं ड्रग्ज जप्त, 4 जण अटकेत

Drugs
पनवेल :
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटी रुपये किमतीची अमली पदार्थ जप्त केली आहेत. 31 जानेवारी रोजी NCB च्या विशेष पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात कोकेन, हायड्रोपोनिक चरस/गांजा आणि कॅनॅबिस जप्त केले. या कारवाईत 4 जणांना अटक करण्यात आली असून, हे तस्करी नेटवर्क आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
तपासात धक्कादायक खुलासे
NCB च्या सूत्रांनुसार, जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये 11.540 किलो उच्च दर्जाचे कोकेन, 4.9 किलो हायब्रिड स्ट्रेन हायड्रोपोनिक चरस/गांजा आणि 5 किलो कॅनॅबिस (200 पॅकेट) यांचा समावेश आहे. यासोबत 1.60 लाख रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
NCB ने याआधी जानेवारी महिन्यात 200 ग्रॅम कोकेन जप्त केले होते. त्यावेळी तपास सुरू करताच मोठे रॅकेट उघड झाले. ह्युमन इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजीच्या मदतीने NCB ने या तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश
NCB च्या प्राथमिक तपासानुसार, जप्त केलेले ड्रग्ज अमेरिकेतून मुंबईत आणण्यात आले होते. कुरिअर, लहान कार्गो सेवा आणि मानवी वाहक (ह्युमन कॅरियर) यांचा वापर करून ही तस्करी केली जात होती. विशेष म्हणजे, या नेटवर्कमधील लोक एकमेकांना ओळखतही नव्हते. ते आपापसात बनावट नावे वापरून संवाद साधत होते, जेणेकरून त्यांचा शोध घेणे कठीण जाईल.
सध्या NCB या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *