नवीन कायद्याच्या रूपाने देशात नवी क्रांति उदयास आली : सहा.पो.नि. सचिन कुलकर्णी

Nagothane Police Baithak
नागोठणे ( महेंद्र माने ) :
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील,नागरिक व पत्रकार यांची देशात 01 जुलै पासून तीन नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू होत असल्याच्या अनुषंगाने कायद्याची माहिती व्हावी यासाठी सोमवार 01 जुलै रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी जुने कायदे जाऊन अभ्यासपूर्वक तयार करण्यात आलेल्या नवीन कायद्याच्या रूपाने देशात नवी क्रांति उदयास आली असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी पिंगोडे सरपंच संतोष कोळी,दर्शना जवके,निलोफर पानसरे,शबाना मुल्ला,अपर्णा सुटे,अदिति ठाकुर,पंकज कोकाटे,गिरीधर गदमले,चंद्रकांत घासे,दिलीप भोईर,विठ्ठल शिंदे,महेश सिरसे,गुन्हा शाखेचे पो.ह.विनोद पाटील.यांच्यासह विभागातील सर्व पोलिस पाटील, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
नवीन कायद्याची माहिती देताना सचिन कुलकर्णी यांनी सांगितले की, आज 01 जुलै पासून पूर्वीच्या काळापासून लागू असलेले भारतीय दंड संहिता,फौजदारी प्रक्रिया संहिता,भारतीय पुरावा कायदा या कायद्यामध्ये बदल होऊन भारतीय न्याय संहिता,भारतीय नागरीक सुरक्षासंहिता व भारतीय सक्षम अधिनियम हे नवीन कायदे आले आहेत. हे कायदे चांगल्या प्रकारे अभ्यासपूर्वक तयार करण्यात आले असल्याने आजचा दिवस हा बदलाचा उत्सव असून नवीन कायद्याच्या रूपाने देशात नवी क्रांति उदयास आली आहे.
या कायद्यात पूर्वी 511 कलम होते त्यात बदल करून ते 358 करण्यात आले असून यामध्ये वेगवेगळे उप कलम वाढविण्यात आले आहे. पूर्वीच्या कायद्यातील पळवाटा बंद झाल्याने गुन्हेगार गुन्ह्यातून सुटणार नसून त्याला जास्तीत जास्त शिक्षेची तरतूद या कायद्यात केली आहे. त्यामुळे हे कायदे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व बहूउपयोगी आहेत. त्यामुळे सर्वांनी याचे काटेकोरपणे पालन करायचे असे आवाहन करून येथे आलेल्या सर्व जबाबदार नागरिकांनी या नवीन कायद्याची माहिती सर्वांना सांगून गुन्हे होणार नाहीत याकडे कटाक्षाने लक्ष देण्याची विनंती शेवटी सचिन कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विनोद पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *