नदी, नाले आणि तलाव कोरडे पडत असल्याने जलचर प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. महाड तालुक्यातील नाते गावात भरवस्तीत आलेल्या सहा फुटी मगरीचे वनविभाग आणि सिस्केप संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. मगरीला कोणतीही इजा न होता तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी वनविभाग आणि सिस्केप संस्थेचे आभार मानले आहेत.
नाते गावातील हनुमान मंदिर परिसरात तसेच टाकीची आळी भागात मगर दिसल्याची माहिती ग्रामस्थांनी सिस्केप संस्थेला दिली होती. मागील पंधरा दिवसांपासून नाते, कोथुर्डे आणि परिसरातील गावांमध्ये मगरी मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. माहिती मिळताच सिस्केप संस्थेचे गणेश खातू यांनी सदस्यांना पाचारण केले. गणेश खातू, चिराग मेथा, स्मरण शिंदे, ओम शिंदे, धर्मेश मेथा आणि योगेश गुरव हे आवश्यक साहित्य व उपकरणांसह घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरज जामदार, सुधाकर गायकवाड, रुपेश पवार, गणेश सावंत आणि प्रवीण गायकवाड यांच्यासह स्थानिक तरुणांनी मगरीला सुरक्षितरीत्या पकडून ठेवले होते. संबंधित मगर ही गोड्या पाण्यातील ‘मार्श क्रोकोडाइल’ प्रजातीची असून तिची लांबी सुमारे ५ फूट ९ इंच होती.
वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप उतेकर, वनरक्षक अंगद भोसले आणि आदित्य भोसले यांच्या उपस्थितीत मगरीचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले. आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या मूळ अधिवासात सोडण्यात आले.
या बचाव मोहिमेमुळे संभाव्य मनुष्य-वन्यजीव संघर्ष टळला असून ग्रामस्थ, वनविभाग आणि सिस्केप संस्थेच्या समन्वयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वन्यप्राणी आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्यांना इजा न पोहोचवता तत्काळ वनविभाग अथवा अधिकृत रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभाग आणि सिस्केप संस्थेने केले आहे.