Dangerous building : स्ट्रक्चरल ऑडिट च्या नावाखाली अनेक इमारतींची सुटका

Mahad Building
महाड ( मिलिंद माने ) :
पावसाळ्यात धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करण्याच्या नावाखाली महाड नगर परिषदेने राबवलेल्या मोहिमेमध्ये दुजाभावपणा करीत असल्याची चर्चा या मोहिमेदरम्यान दिसून आली. शहरातील आदर्श नगर मधील एका जुन्या इमारतीमधील नागरिकांना खाली करण्यासाठी ज्या पद्धतीने पोलीस पथक मागवण्यात आले त्याप्रमाणे इतर इमारतींवर कारवाई करण्यास पालिकेचा हात का सरसावत नाही असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महाड शहरात ऑगस्ट २०२० रोजी काजळपुरा भागातील तारीक गार्डन इमारत कोसळली होती. यामध्ये १९ जण मृत्युमुखी पडले होते तर ७८ जणांचे प्राण वाचले होते. त्यानंतर महाड नगर परिषदेने धोकादायक इमारतींची संख्या किती याबाबत मोहीम चालू केली मात्र तब्बल २०२० नंतर एकाही धोकादायक इमारतींवर मागील चार वर्षात नगर परिषदेतर्फे कोणतीही कारवाई केलेली नाही. केवळ पावसाळ्यात रहिवाशांना व इमारत मालकाला नोटिसा बजावण्याचा फार्स नगरपरिषदेकडून चालू आहे. त्यातच इमारतीमधील रहिवाशांकडून खाजगी एजन्सी मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत सुस्थितीत असल्याचा दावा केला जातो यामुळे पालिकेकडून अशा इमारतींवर अद्याप कारवाई झालेली नाही.
महाड शहरात नगर परिषदेने २०२१ मध्ये ३०० हुन अधिक इमारतींची तपासणी केली होती. या तपासणीमध्ये ३४ इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट नंतर या यादीतून अनेक इमारतींची नावे वगळण्यात आली आहेत. परिषदेच्या अख्यातारीत असलेल्या धोकादायक इमारतीबाबत स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर शहरात ३४ इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. धोकादायक इमारतींच्या नावाखाली नोटिसा बजावण्याचे काम मात्र पावसाळा चालू झाल्यावर नगरपालिका करते मात्र कारवाई शून्य असल्याचे या निमित्ताने दिसून येते.
महाड नगर परिषदेने आज रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरील इंगवले अपार्टमेंटमधील धोकादायक इमारतीमधील मूळ मालक रहात असलेल्या आण्णा इंगवले यांना पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून घर खाली केले तर याच इमारतीतील दोन व्यावसायिक गाळेधारकांना देखील गाळे खाली करण्याचे काम पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इमाने ईतबारपणे पाऊस साप भिजत करून घेतले यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड झाल्याचे यावेळी लोकांकडून ऐकण्यास मिळाले.
महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता सद्यस्थितीत इंगवले अपार्टमेंट व अमिना अपार्टमेंट या दोन धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खाली करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र अमिना अपार्टमेंट बाबत तीन वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचे जाहीर केल्यानंतर देखील रहिवाशी व विकासक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला व रहिवाशांनी खाजगी एजन्सी कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले त्यामध्ये ही इमारत सुस्थितीत असल्याचे दर्शविले. मात्र नगर परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथून या इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ही इमारत धोकादायक असल्याचे त्यांच्या अहवालात स्पष्टपणे सांगितले असताना देखील आज ही इमारत खाली करण्याबाबत तहसीलदार महाड यांच्याकडे पुन्हा दिवाणी केस चालू आहे. यामध्ये तहसीलदारांकडून निर्णय आल्यानंतरच ती खाली करण्यात येईल असे महाड नगर परिषदेचे अभियंता प्रवीण कदम यांनी सांगितले
एकंदरीत महाड नगर परिषदेमध्ये बिल्डर डोले नगरपालिका हाले बिल्डरांच्या इशारावर महाड नगर परिषदेचा कारभार चालू असल्याने धोकादायक इमारतींबाबत महाड नगरपरिषद कोणताही ठोस निर्णय घेण्याची शक्यता नसल्याने उद्या मुसळधार पावसात धोकादायक इमारती मधून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार महाड नगरपरिषद राहील का ? की पुन्हा. कायद्याच्या नावाने पळवाट काढून आपली जबाबदारी पुन्हा एकदा झटकण्याची वेळ नगर परिषदेवर येणार तर नाही ना अशी अवस्था आजच्या धोकादायक इमारतीं मधील रहिवाशांना खाली करण्याच्या पद्धतीवरून पाहण्यास मिळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *