कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते बसस्टँडलगत पुलावरील संरक्षण रेलिंग तुटून तब्बल ४७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही या धोकादायक रेलिंगची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणी दुर्घटनेचा धोका वाढला असून, “नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल अर्जदार महेश हरिचंद्र पेरणे यांनी उपस्थित केला आहे.
दिनांक ३० जून २०२६ रोजी धामोते बसस्टँडलगत पुलावरील संरक्षण रेलिंग तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तब्बल १५ दिवस दुरुस्ती न झाल्याने महेश पेरणे यांनी १५ जुलै रोजी ग्रामपंचायत कोल्हारे कार्यालयात लेखी अर्ज सादर करून तातडीने रेलिंग दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, अर्ज करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, १७ ऑगस्ट २०२६ रोजीही तुटलेल्या रेलिंगची दुरुस्ती झालेली नसल्याचे छायाचित्रांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेत महेश पेरणे यांनी १७ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कर्जतच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात यापूर्वी सादर केलेल्या अर्जावर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची लेखी माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
वर्दळीच्या पुलावर अपघाताचा धोका….. धामोते येथील हा पूल नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या पुलावरून शालेय विद्यार्थी, नागरिक, बस, रुग्णवाहिका, सार्वजनिक प्रवासी वाहने तसेच दुचाकी व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी पुलाचे संरक्षण रेलिंग तुटलेल्या अवस्थेत राहणे ही बाब नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. पावसाळ्यात रस्ते व पुलाचा परिसर ओला आणि निसरडा होत असल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत संरक्षण रेलिंग नसल्याने एखाद्या वाहनाचा ताबा सुटल्यास किंवा पादचारी घसरल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुर्घटनेची वाट पाहताय का?…. नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या कामासाठी अर्ज करूनही ४७ दिवस उलटून गेल्यानंतरही दुरुस्ती न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. सामान्य जनतेच्या जीवाशी प्रशासन आणि शासकीय अधिकारी आणखी किती दिवस खेळणार? नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न घेऊन अर्ज करूनही काम होत नसेल, तर दाद कुणाकडे मागायची? असा सवाल महेश पेरणे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, पंचायत समिती कर्जत व ग्रामपंचायत कोल्हारे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन धामोते पुलावरील तुटलेले संरक्षण रेलिंग तत्काळ दुरुस्त करावे, तोपर्यंत आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने आता आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष दुरुस्ती कधी होणार? याकडे नागरिकांसह धामोते ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.