मुकद्दर क्रिकेट संघाने सहाव्या वर्षात पदार्पण करताना नेहमीच ज्यांनी ज्यांनी गावासाठी भरीव योगदान दिले आहे ज्या व्यक्तींनी समाजाभिमुख कामे केली आहेत. क्रीडा असो किंवा सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला अमूल्य वेळ खर्ची घातला आहे अशा महत्वाच्या व्यक्तींना आज दि.२९ रोजी येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात गौरविण्यात आले.
यामध्ये काही खेळाडूंचा समावेश होता त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष यांचाही यथेच्छ सत्कार यावेळी करण्यात आला होता. त्यातच शिक्षणासारखे पुण्यकर्म करून अनेक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे शिक्षक योगेश जाधव यांना द रियल हिरो अवार्डने सन्मानित करण्यात आले. हा सत्कार त्यांनी आपले बंधू उबाठा गटाचे शहरप्रमुख कुलदीप जाधव यांच्या सोबत शाल आणि माथेरान नकाशाचे सन्मानचिन्ह स्वीकारले.यावेळी कुलदीप जाधव यांनी सांगितले की योगेश हा माझा लहान बंधू सामाजिक क्षेत्रात हिरो आहेच पण आमच्या कुटुंबातील सुध्दा तो हिरो आहे.
जे विद्यार्थी माझ्या हाताखाली शिक्षण घेतले त्यांनी महाविद्यालयात जाऊन उत्तम प्रकारे शिक्षण घेऊन प्रगतीचा आलेख उंचावला आहे.विद्यार्थ्यांची जी काही प्रगती आज दिसते आहे ते पाहून खरोखरच हा पुरस्कार खूपच मोलाचा आहे.मला ज्यांनी ज्यांनी आजवरच्या कार्यकाळात सहकार्य केले त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे असे गौरवोद्गार योगेश जाधव यांनी केले.
माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रकाश सुतार, उद्योजक भास्कर शिंदे,धनगर समाज माजी अध्यक्ष राकेश कोकळे, पतसंस्था माजी सभापती हेमंत पवार यांनी योगेश जाधव यांचे अभिनंदन केले.