दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रियकरासह साथीदार महिलेलाही ताब्यात

पनवेल | संजय कदम 
पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन महिन्यांपूर्वी चिंचवली परिसरात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी करण नामदेव पाटील याला अटक करण्यात आली असून तपासादरम्यान त्याची दुसरी प्रेयसीही गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
11 एप्रिल रोजी चिंचवलीजवळील पनवेल-दुंद्रे मार्गावरील वनविभागाच्या जागेतील झुडपांमध्ये एका अनोळखी महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. ओळख पटत नसल्याने पनवेल तालुका पोलिसांनी 200 हून अधिक बेपत्ता महिलांची पडताळणी केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मृत महिलेची ओळख शीळ-डायघर परिसरातील अनिता देवी भगवान राजभर (वय 30) अशी पटवली. त्यानंतर तिच्या संपर्कातील करण पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीत करण पाटील याने अनिता राजभर हिने लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत असल्याने 6 एप्रिल रोजी लोखंडी रॉडने तिच्या डोक्यात वार करून हत्या केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह कारमधून चिंचवली परिसरात आणून पेट्रोल टाकून जाळल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात वापरण्यात आलेली कार आणि लोखंडी रॉडही पोलिसांनी जप्त केली आहे.
दरम्यान, पुढील तपासात आरोपीची दुसरी प्रेयसी सुरेखा सिंग (वय 21, शिळफाटा) हिचीही गुन्ह्यातील भूमिका समोर आली. मृतदेह जाळताना ती घटनास्थळी उपस्थित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिलाही चार चाकिसह ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला असून पुढील तपास सुरू आहे.