दी लाईफ फाऊंडेशन तर्फे आवेटी येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

Aveti Camp
सोगाव (अब्दुल सोगावकर ) :
आरोग्य, शैक्षणिक तसेच इतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील दी लाईफ फाऊंडेशन यांनी शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल तसेच ग्रुप ग्रामपंचायत कुर्डूस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे मंगळवार दि. २१ मे रोजी सकाळी १० ते २ वाजेच्या दरम्यान गणेश मंदिर आवेटी  येथे आयोजन करण्यात आले होते.
या नेत्र तपासणी शिबिराचा कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यामध्ये १६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले, यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या १० रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे नेण्यात आले. तर उर्वरित ६ रुग्णांना वैद्यकीय अडचणीमुळे जाता आले नाही. या शिबिरात नेत्र दोष असणाऱ्या रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.
दी लाईफ फाऊंडेशन तर्फे अलिबाग तालुक्यातील आतापर्यंत ७२ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे. यापुढील काळात अलिबाग तालुक्यात अनेक ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करून मोतीबिंदू मुक्त करण्याचा मानस दी लाईफ फाऊंडेशन यांनी व्यक्त केला आहे.
या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *