जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची नुकतीच आरक्षण सोडत पार पडली आणि सक्रीय इच्छुक उमेदवारांनी आपल्या भुवया उंचावयाला सुरुवात केली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाटाव पंचायत समिती गण मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी ही तळाघर ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्याला मिळावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून पक्षाकडे होत आहे.
किल्ला, धाटाव, वाशी ,वरसे, वाली इत्यादी ग्रामपंचायतींमधून याआधीही उमेदवारांना या गणातून संधी देण्यात आलेली आहे. मात्र तळाघर ग्रामपंचायतीमधील राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते अजूनही या संधीपासून वंचित राहिले आहेत. तर विशेषतः या परिसरातील बोरघर गावातील सौ. दीपिका दिनेश भगत या सध्या रोहा तालुका कुणबी समाज महिला अध्यक्ष असून त्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समाजोपयोगी काम करत आहेत तसेच त्या निष्ठावंत राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षाचे काम करत असून खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, युवा नेते तथा माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना संघटित करून विविध उपक्रम राबवण्यात यशस्वी ठरत आहेत.
दीपिका दिनेश भगत या तरुण, तडफदार आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाचे प्रतिक असून, त्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी आहेत. तसेच त्या या गणातून विशेष म्हणजे हा मतदारसंघ कुणबी बहुसंख्य असून त्यामध्ये भगत यांना मोठा जनाधार मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना पक्षाने त्यांचा विचार करावा, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी असल्याचे बोलले जाते.
तळाघर ग्रामपंचायतीमधून उमेदवारी दिली गेली, तर येथील मतदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते अधिक उत्साहाने कामाला लागतील आणि निवडणूक विजयाच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास येथील ग्रामस्थ व्यक्त करत असून याचा पक्षाच्या नेत्यांनी योग्य विचार करुन ही उमेदवारी यांना द्यावी अशी आग्रही मागणी नेते तथा लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांच्या कडे करणार असल्याचे बोलले जात आहे.