अलिबाग तालुक्यातील थळ ग्राम पंचायत हद्दीतील थळ बाजार परिसरात पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धडक कारवाई करत गांजा, गावठी दारू आणि विविध धारदार हत्यारे जप्त केली. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस शिपाई साहेबराव सुनील जाधव यांच्या फिर्यादीवरून रियाज बुद्दीन अनवरे, करण अनंतराव पवार आणि ओमकार चंदन पेडणेकर या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त महितीनुसार, कनकेश्वर फाटा परिसरात बेकायदेशीररित्या गांजाची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाळत ठेवून ही कारवाई केली. रियाज अनवरेच्या पत्र्याच्या खोलीत २२४ ग्रॅम गांजा, रोख रक्कम, गावठी दारू तसेच तलवारी, कोयता, काती यांसारखी हत्यारे जप्त झाली. करण पवार व ओमकार पेडणेकर यांच्या विरोधातही मादक पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम १९८५, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ आणि शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपी रियाज अनवरेवर यापूर्वी २०२५ मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सौदरमल करीत आहेत.