“तुम्हीच माझा आवाज बना!”; माणगाव बायपास व टोलमाफीसाठी राजाभाऊ ठाकूर यांचे पत्रकारांना आवाहन

माणगाव | नरेश पाटील 
माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थींच्या गौरवासाठी रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी कुणबी भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव राजेंद्र (राजाभाऊ) मधुकर ठाकूर यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. निमंत्रणाला मान देत उपस्थित राहिलेल्या ठाकूर यांनी आपल्या भाषणातून माणगावच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधत प्रसारमाध्यमांना, “तुम्हीच माझा आवाज बना आणि हा संदेश संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवा,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. त्यांनी उद्घाटन, मार्गदर्शन तसेच काही पुरस्कारार्थींचा सत्कार केल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी पुण्याकडे प्रयाण केले. तर नामदार भरतशेठ गोगावले कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. याचा संदर्भ देत ठाकूर म्हणाले की, दोन्ही मंत्री उपस्थित असते तर माणगावच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे थेट लक्ष वेधले असते; मात्र ते उपस्थित नसल्याने प्रेस क्लब व पत्रकारांनीच आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा.
ठाकूर यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासचा रखडलेला प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. आगामी गणेशोत्सवापूर्वी बायपासचा किमान एक मार्ग सुरू झाला तर माणगावकरांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी हा प्रश्न संबंधित मंत्र्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरील टोलमधून माफी मिळावी, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. दोन्ही मंत्री माणगावकरांसाठी पालकांसमान असून, त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पुरस्कारार्थींच्या सामाजिक व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचे कौतुक करताना त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या कुटुंबातील सदस्याच्या यशात सहभागी होणे ही अभिमानाची बाब असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले. सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
माणगाव तालुका प्रेस क्लबच्या या गौरव सोहळ्यात कर्तृत्वाचा सन्मान झाला; तर राजाभाऊ ठाकूर यांच्या भाषणातून माणगाव बायपास आणि स्थानिक टोलमाफीचा जनहिताचा आवाज माध्यमांच्या माध्यमातून मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार स्पष्ट झाला. कार्यक्रमासाठी मिळालेल्या निमंत्रणाबद्दल आयोजकांचे आभार मानत ठाकूर यांनी पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या आणि शेवटी “तुम्हीच माझा आवाज बना!” या आवाहनातून पत्रकारांना माणगावकरांच्या प्रश्नांचे प्रभावी दूत बनण्याचे आवाहन केले.