अलिबाग तालुक्यातील नागाव-माळी भेरसे येथे २४ वर्षीय भावेश प्रमोद पाटील या तरुणाने मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर २०२५ रोजी घडली. या प्रकरणाची माहिती त्याचे वडील प्रमोद रघुनाथ पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली.
भावेश हा तळोजा एमआयडीसीतील जिंदाल ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याने राजीनामा दिल्याने तो सुमारे दीड महिना बेरोजगार होता. बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या नैराश्य आणि मानसिक तणावामुळे तो अधिकच एकाकी होत गेला, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
घरात कोणीही नसताना त्याने आपल्या खोलीत छताच्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. तातडीने रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.