
माथेरान | दिनेश सुतार
माथेरानच्या निसर्गरम्य पावसाळी पर्यटनाचे आकर्षण आणि शहराची जीवनवाहिनी मानला जाणारा ऐतिहासिक शारलेट लेक अखेर गाळमुक्तीसाठी रिकामा करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १०) नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे पाणी सोडण्यात आले. यावेळी विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका तसेच माथेरानकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून तलाव रिकामा करण्यावरून माथेरानमध्ये दोन मतप्रवाह होते. आगामी एप्रिल-मे महिन्यात पर्यटकांसह स्थानिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी तलावातील गाळ काढणे आवश्यक असल्याचे एका गटाचे मत होते. तर तलाव रिकामा केल्यास पाणीटंचाईची संभाव्य समस्या निर्माण होण्याची भीती दुसऱ्या गटाकडून व्यक्त केली जात होती. अखेर भविष्यातील पाणीपुरवठ्याचा विचार करून तलाव गाळमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१४ मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तलावाची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी पुन्हा गाळमुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, तलावाच्या गाळमुक्ती आणि सुशोभीकरणासाठी काढण्यात आलेल्या सुमारे ५ कोटी रुपयांच्या टेंडरवरून यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने २६ ट्रॅक्टर गाळ काढल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष पाहणीत तलावातील मोठ्या प्रमाणातील गाळ कायम असल्याचा आक्षेप काही नगरसेवकांनी घेतला होता. त्यामुळे ५ कोटींच्या खर्चानंतरही अपेक्षित सफाई झाली नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव पूर्णपणे गाळमुक्त करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात माथेरानकर आणि पर्यटकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Related