ड्रोन वापरून जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन! रेवदंड्यात गुन्हा दाखल, ड्रोन जप्त

Dron camera
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करताना साळाव पुलावर प्री-वेडिंग शूटसाठी ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्या तरुणाविरोधात रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जितेंद्र रामचंद्र मगर (वय ४०, पोलीस शिपाई, रेवदंडा पोलिस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुलदीप गजेंद्र उपाध्याय (वय २५, फ्लॅट नं. ५, पुष्कराज अपार्टमेंट, गांधी चौक, बदलापूर, ठाणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १७ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता कुंडलिका खाडीवरील साळाव पुलाजवळ घडली. उपाध्याय हा आपल्या प्री-वेडिंग फोटोशूटसाठी पुल परिसर व समुद्रकिनारा ड्रोन कॅमेराने चित्रीत करताना आढळून आला.
या प्रकरणी रेवदंडा पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र. ६८/२०२५ नुसार भा.न्या.दं. २०२३ च्या कलम २२३(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २,००० रुपयांचा ड्रोन कॅमेरा ताब्यात घेतला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल थळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *