पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नवीन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. नेत्र शस्त्रक्रियागृह, वातानुकूलित शवागृह, मॅमोग्राफी मशीन, आयुष उद्यान आणि केंद्रीय निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग यांचे आमदार प्रशांत ठाकूर व विक्रांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, “रुग्णसेवा हीच जनसेवा” या भावनेतून रुग्णालयातील डॉक्टर कार्यरत असून यामुळे रुग्णालयाची विश्वासार्हता वाढत आहे. तसेच सीएसआर फंडातून १० लाख रुपयांची मोफत औषधे पुरवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार विक्रांत पाटील यांनी रुग्णालयातील सुधारित सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. माजी महापौर कविता चौतमोल यांनी कोरोनाकाळातही या रुग्णालयाने उल्लेखनीय सेवा दिल्याचे नमूद केले.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तोडीस तोड सुविधा उपलब्ध झाल्याचे सांगून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा द्यावी, असे आवाहन केले.